शीतलकुमार कांबळे सोलापूर : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रुग्णाला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना अनेक अडचणी येतात. रुग्णवाहिकेला धक्के बसत असल्यामुळे त्याच्यावर उपचार करणे कठीण होते. यामुळे त्या रुग्णाचे प्राण जाण्याचीही शक्यता असते. याला एक चांगला पर्याय म्हणून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘इनोवेटिव्ह मेथड टू रिड्युस व्हायब्रेशन इन अॅम्ब्युलन्स’ हा प्रकल्प सादर केला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला भारत सरकारकडून कॉपीराईटचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
आपण कल्पना करु शकतो, एक अत्यवस्थ झालेल्या रुग्णाला इंजेक्शन देताना किंवा आॅक्सिजन देताना जर रुग्णवाहिकेला धक्का लागल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो. जर एखादी स्त्री गर्भवती असेल तिला रुग्णवाहिकेतून घेऊन जाताना रुग्णवाहिकेमधील स्ट्रेचरला धक्का लागल्यास हे जीवावर बेतू शकते. गावातून शहराकडे जाणाºया रुग्णवाहिकेला तर आणखीनच अडचणींना सामोरे जावे लागते. शहरामध्ये ट्रॅफिक असल्यास रुग्णवाहिका इतर मार्गाने रुग्णालयाकडे जाते़ अशावेळी तिथे रस्ता कसा असेल हे सांगता येत नाही. जर रुग्णवाहिकेमधील स्ट्रेचरला रस्त्यांवरील खड्डे तसेच गतिरोधकामुळे धक्के बसले नाही तर..़ हा विचार सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. अविनाश लावणीस व त्यांचे विद्यार्थी विकास परमार, मोईन नदाफ, व्यंकटेश पारीख, दत्तात्रय म्हमाणे यांनी केला.
‘इनोवेटिव्ह मेथड टू रिड्युस व्हायब्रेशन इन अॅम्ब्युलन्स’ या प्रकल्पाला भारतातून ३७ बक्षिसे मिळाली आहेत. आयआयटी मुंबई, सीओई पुणे, टाटा टेक्नॉलॉजी, असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटी उदयपूर, एमआयटी आळंदी, स्टार्टअप इंडिया भारत सरकार, जेएसपीएम पुणे यासह सोलापुरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांत झालेल्या स्पर्धेत या प्रकल्पास बक्षिसे मिळाली आहेत.
प्रकल्प कसे काम करतो ? सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पामध्ये चुंबक (मॅग्नेट) व सेन्सर यांचा वापर केला आहे. जर गाडी खड्ड्यामध्ये गेली तर गाडीची खालची बाजू व वरच्या बाजूमध्ये अंतर तयार होते. हे अंतर मॅग्नेटिक करंटने भरुन निघते. यामुळे रुग्णवाहिकेला कमीत कमी धक्के बसतात. रुग्णवाहिकेत असलेला रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी, स्ट्रेचर आणि इतर साधने यांना धक्का बसत नाही. यामुळे रुग्णवाहिकेतच रुग्णावर उपचार करणे अधिक सोपे होते.
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राचार्य तसेच संस्थाचालकाचे मोलाचे सहकार्य मिळाले. हा प्रकल्प म्हणजे आमच्या एक वर्षाच्या कष्टाचे फळ आहे. सहा महिन्यांपूर्वी कॉपीराईटसाठी अर्ज केला होता. दोन दिवसांपूर्वी कॉपीराईटचे प्रमाणपत्र मिळाले आहे. एका खासगी कंपनीला आमची संकल्पना आवडली असून, येत्या काळात देशभरातील रुग्णवाहिकेत आमचा प्रकल्प वापरला जाईल. - प्रा. अविनाश लावणीस, मेकॅनिकल विभाग, सिंहगड अभियांत्रिकी