सोलापूर : जिल्ह्यात सेवालाल महाराजांचे स्मारक, नॉन क्रिमिलेअरच्या अटीतून बंजारा समाजाची सुटका, वसंतराव नाईक महामंडळ, जिल्ह्यात बंजारा भवनाची उभारणी आदी मागण्यांसाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मुळेगाव तांडा ग्रामपंचायतीचे सरपंच विजयकुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र् भोसले यांची भेट घेतली. केंद्र आणि राज्यातील सरकार बंजारा समाजाच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. समाजाकडे बघण्याची सरकारची आकस बुद्धी आहे. याकडे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले. राज्यात २२ टक्के भटके विमुक्त असताना या समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय नाही. वारंवार विनंती करूनही बंजारा समाजाच्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा दिला जात नाही. त्यामुळे समाजाचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, अशी तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे.
बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली गावाची अट न घालता स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, रमाई आवास योजनेच्या धर्तीवर समाजाला घरकुलाचे लाभ द्या, वसंतराव नाईक महामंडळासाठी निधीची वाढीव तरतूद करा, समाजाच्या पारंपरिक व्यवसायातील अडचणी दूर करा, समाजासाठी बंजारा भवनाची उभारणी करा, तांडा तेथे शाळा, व्यायामशाळा, अंगणवाड्या, आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. या मंडळात मनोहर राठोड, तेजस्विनी महिला बचत गटाच्या अश्विनी रवींद्र राठोड,नागनाथ जाधव, प्रकाश चव्हाण, अंकुश राठोड, रमेश चव्हाण, जैनुद्दीन पटेल, सुभाष राठोड, प्रकाश राठोड, श्रीकांत राठोड, डॉ़ ए़ एम़ शेख, किसन राठोड, धनू राठोड, बाळू पवार, राजकुमार राठोड, दशरथ पवार, धर्मराज चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, रेखू राठोड, रतन पवार, फुलसिंग चव्हाण, अश्विनी चव्हाण आदींचा समावेश होता.