सोलापूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची जागा हडप करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजी महापौरासह दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी महापौर मनोहर गणपत सपाटे (रा. हॉटेल शिवपार्वती, लकी चौक सोलापूर), लता सुदाम जाधव (रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मनोहर सपाटे हे २० मार्च १९९३ ते २० मार्च १९९४ या कालावधीमध्ये महापौर होते. दरम्यानच्या काळात त्यांनी महापौरपदाचा गैरवापर करीत संगनमत करून बेकायदेशीर खोटे व बनावट कागदपत्रे तयार केली. मुरारजी पेठेतील अभिषेक नगरात असलेल्या टी.पी.४ फायनल फ्लॉट नं. १०६ क्षेत्र ७८६३ चौ.मी.ची जमीन शासकीय किमतीच्या २५ टक्के रक्कम भरल्याचे दाखविले. मात्र, त्यांनी ती रक्कम भरली नव्हती. पैसे भरल्याचे दाखवून त्यांनी ती जागा ताब्यात घेतली.
जागा खरेदी करताना संस्थेच्या सदस्य नसताना जागेच्या खरेदीखतावर संस्थेचे सचिव म्हणून लता जाधव यांची सही करून घेतली. मनोहर सपाटे यांच्या गैरकारभारात लता जाधव यांनी सही करून मदत केली अशी फिर्याद योगेश नागनाथ पवार (वय ३७, रा. अभिषेक पार्क धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ सोलापूर) यांनी दिली आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात भांदवि कलम १२० (ब) १९६, ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १२ (१)(ड), १३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास सुरू
मनोहर सपाटे हे तत्कालीन महापौर असल्याने व पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केल्यामुळे हा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे. पोलीस निरीक्षक कविता मुसळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.