सोलापूर : गेल्या पाच वर्षांपासून ठणठणीत कोरडा पडलेला श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा तलाव यंदा वरुणराजाच्या कृपेने काठोकाठ भरला असून, ‘लोकमत’च्या संकल्पनेतून अन् विविध जाती-धर्मातील सात संघटनांच्या पुढाकारातून ‘दीपोत्सव’ हे यंदाच्या यात्रेचे आकर्षण ठरणार आहे. या सोहळ्यातील हजारो दिव्यांनी मंदिर अन् तलाव परिसर उजळून निघणार आहे. गतवर्षीच्या प्रकाशमय यात्रेची प्रचिती यंदाही भाविकांना येणार असून, ‘दीपोत्सव’ सोहळ्यात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा रंगणार अन् सजणार आहे.
३०-३५ वर्षांपूर्वी जशी यात्रा साजरी व्हायची तशी यात्रा साजरी व्हावी, या भाविकांच्या भावनेचा विचार करुन ‘लोकमत’ने गेल्यावर्षी त्यावर प्रकाश टाकला होता. ‘प्रकाशमय यात्रा-सिद्धरामेश्वरांची यात्रा’ ही संकल्पना ‘लोकमत’ने मांडली. वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले आणि त्यांच्या टीमने या संकल्पनेसाठी पुढाकार घेतला. भक्तगणांनी घरांवर, दुकानांवर विद्युतरोषणाई तर नंदीध्वज मार्गावर विद्युत माळा सोडण्याबाबत सर्वच जाती-धर्मांमधील लोकांना आवाहन केले. त्यास भरभरुन प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून यंदा ‘लोकमत’च्या पुढाकारातून दीपोत्सव या सोहळ्याची संकल्पना शेकडो सोलापूरकरांकडून पुढे आली आहे. दीपोत्सवाच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरासह सोलापूरचे ब्रँडिंग करण्याचा उद्देशही ‘लोकमत’सह सात संघटनांनी ठेवला आहे.
बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिला. तोच संदेश ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमातून दिसून येतो. यात्रेतील चार प्रमुख सोहळ्यांवेळी निघणाºया मिरवणुकीतील मानाचे सात नंदीध्वज हे वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे त्यातून समतेची प्रचिती येते. हाच धागा पकडून अक्षता सोहळ्याच्या आधी तीन दिवस मंदिर परिसरात जिथे योग्य ठिकाणी जागा मिळेल, त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्याचा विचार ‘लोकमत’ने मांडला. या संकल्पनेत सहभागी होण्याचा निर्णय लिंगायत, मराठा, धनगर, ब्राह्मण, मागासवर्गीय, पद्मशाली अन् मुस्लीम समाजातील प्रत्येक एकेक संघटनांनी घेतला आहे.
दीपोत्सवात या संघटनांचा असणार सहभाग
- ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा यंदाही प्रकाशमय होणार आहे. गेल्या वर्षी नंदीध्वज मार्गांवर झळाळी दिसून आली. यंदा या उपक्रमाचा विस्तारही वाढविण्यात येणार असून, संपूर्ण शहर लख-लख प्रकाशात उजळून निघावे, यासह दीपोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हिजनसह सकल मराठा समाज, मार्कंडेय जनजागृती संघ, हिंदू धनगर सेना,माहेश्वरी प्रगती मंडळ, विजापूर वेस युवक संघटना, समस्त ब्राह्मण समाज संघटनेने पुढाकार घेतला आहे.
- पर्यटन वाढीचाही उद्देश
- - महाराष्ट्रासह परप्रांतातील अनेक जण कामानिमित्त सोलापूरला येतात. काही भाविक देवदर्शनासाठी पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूरच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र सोलापुरात येऊन त्यांना ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिराबाबत कसलीच कल्पना नसते.
- - ‘ए टेम्पल इन वॉटर’ अशी ख्याती असताना मंदिराचे ब्रँडिंग कुठे होताना दिसत नाही. मंदिराचे जेणेकरुन सोलापूरचे ब्रँडिंग व्हावे आणि सोलापूरला पर्यटकांची संख्या वाढावी या उद्देशातून या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तमाम सोलापुरातील भक्तगणांसह विविध सेवाभावी संस्था उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.