सोलापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. शंभरकर यांनी आज विधान परिषद निवडणूकमतदानाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात ही बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, पोलीस उपायुक्त बापू बांगर उपस्थित होते.
शंभरकर यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन होईल याकडे लक्ष द्यावे. नियुक्त समन्वय अधिकारी यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडत असतानाच इतर विभागाशीही समन्वय ठेवावा. त्याचबरोबर अहवाल वेळीच द्यावेत.
शंभरकर यांनी सांगितले की, मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा आहेत का याची पाहणी करावी. मतदान केंद्रात स्वच्छता करुन घ्यावी. सैनिटायझर फवारणी करुन घ्यावी. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानेही पाहणी करावी. जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये असणाऱ्या केंद्रात संबंधित प्रशासनाने आवश्यक सुविधा असल्याची खात्री करावी.
निवडणूक प्रक्रियेत कामकाज करणाऱ्या आणि आरोग्य विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांना प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षणादरम्यान शंका निरसन करावे, अशाही सूचना शंभरकर यांनी केल्या.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी बैठकीच्या सुरवातीला निवडणूक आयोगाच्या सूचना आणि त्याअनुषंगाने केलेली तयारी याची माहिती दिली.
या बैठकीस उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अनिल कारंडे, अरुणा गायकवाड, दीपक शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, वित्त आणि लेखा अधिकारी अजय पवार, तहसीलदार जयवंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे आदी उपस्थित होते.