राजकुमार सारोळेसोलापूर : जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आत्तापर्यंत स्थानिक आघाड्यांचा दबदबा कायम राहिला आहे. राज्यात महाविकास आघडीची सत्ता असल्याने या निवडणुकीवर राष्ट्ववादी काँग्रेस व काँग्रेसचा वरचष्मा राहील असे सांगितले जात आहे.
कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ॲाक्टोबरपासून या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र घेता व सादर करता येणार आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीर झालेल्या गावात राजकारण रंगू लागले आहे. स्थानिक आघाड्यात सक्रीय असलेले नेते सत्ताधार्यांकडे आकर्षीत झाले आहेत. यापूर्वी राज्यात युतीची सत्ता असताना भाजपने जनतेतून थेट सरपंच निवडून बर्याच ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीने सत्ता आल्यावर हा निर्णय रद्द केला. त्यामुळे आता प्रभाव दिसून येईल.
तिन्ही पक्ष आले एकत्र नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे नेते एकत्र आले होते. आता ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावरही हा प्रयोग यशस्वी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.
स्थानिक संस्थांमध्ये राकाँचा दबदबाजिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचेच पण मोहीते पाटील गटाचे सदस्य फुटल्याने सत्ता राखता आली नाही.पण बर्याच ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडयांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे यावेळेसही हा प्रयोग होईल असे वाटत आहे.
ग्रा.पं. निवडणुकीत आघाडी होणार का?काही आमदार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घालत नाहीत असा आजपर्यंतचा अनुभव आहे. कारण याचा विधानसभा निवडणुकीच्यावेळेस त्रास होतो.त्यामुळे स्थानिक आघाडी करण्यास मुभा दिली जाते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने स्थानिक पातळीवर अशी आघाडी होणार का असा सवाल होत आहे.
एकत्र लढल्यास भाजपला फटकाजनतेतून थेट सरपंच निवडीची प्रक्रीया आणून भाजपने बर्याच ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना एकत्र लढल्यास महाविकास आघाडीचा फायदा होणार आहे. याचेच गणित महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून जुळविले जात आहे. भाजपाला याचा फटका बसेल.