कामती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कैलास ऐवळे, रत्नाकर ऐवळे, रघुनाथ पवार सर्व रा. हाराळवाडी व सोबत अनोळखी ६ व्यक्तींनी संगणमत करून २१ रोजी कामती ते मंद्रुप रोडवरील देशमुख प्रशालेजवळून ग्रामपंचायत सदस्य लिंगराज व्हनमाने यांच्या एम. एच.१३ बी. वाय. ८२१५ या दुचाकीस स्कार्पिओ आडवी लावली. नंतर हातपाय आणि डोळ्यास पट्टी बांधून बळजबरीने चारचाकी गाडीत बसविले. नंतर लाथाबुक्यानी मारहाण करुन रहाटेवाडी ता. मंगळवेडा शिवारातील तलावाच्या भरावावर हातापायास व डोळ्यास पट्टी बांधलेल्या अवस्थेत सोडले, अशी फिर्याद लिंगराज व्हणमाने यांनी कामती पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन माने हे करीत आहेत.
अशी केली सुटका
रहाटेवाडीजवळील तलावाजवळ दोन फुट अंतरावर पाणी असलेल्या ठिकाणी हात, पाय बांधलेल्या अवस्थेत सोडले असल्याने हालचाल करता येत नव्हती. अखेर हात, पायास ताण देत शिटफितीने अगोदर डोळ्याची पट्टी काढली. नंतर हात पाय स्वतः सोडवून घेतले. पुन्हा रहाटेवाडी चौकात येऊन एकाच्या मोबाईलवरून गावाकडे फोन लावला व पोलिसांना बोलावून घेतले. अशी स्वत:ची सुटका करून घेतल्याचे अपहरण झालेले ग्रामपंचायत सदस्य लिंगराज व्हनमाने यांनी सांगितले.