कुर्डूवाडी : गेल्या मार्च २०२० पासून कोरोना आपत्तीमध्ये गावपातळीवरील ग्रामपंचायत कार्यालये ही पूर्णवेळ सुरू आहेत. तेव्हापासून तेथील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी एकही दिवस सुटी न घेता स्वतःच्या ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सांभाळून गावाचे संरक्षण करण्याचे काम करत आहेत. प्रशासनाचे सर्व विभाग येत असून, ग्रामपंचायत व ग्रामसेवकांना कोणतीही कामे सांगत आहेत. याला तोंड देत ग्रामपंचायत यंत्रणा काम करीत आहे.
स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेता गावाची सेवा करण्यात ही यंत्रणा सध्या गुंतली आहे. गावपातळीवर
कोणतीही योजना, अभियान बंद नाही. दुसरीकडे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात फक्त १५ टक्के कर्मचारी उपस्थित असून, कामाच्या बैठका या ऑनलाइन सुरू आहेत. ग्रामपंचायतीच्या मासिक सभा मात्र नियमितपणे पार पडत आहेत. कोरोना समितीच्या सभाही घेण्यात येतात. नागरिक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधून ग्रामसेवकांना यापासून संरक्षित करून गावातील इतर कर्मचारी व पदाधिकारी आल्याशिवाय ग्रामपंचायत उघडू नये, असे ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी सूचित केले आहे.
गावस्तरीय कोरोना समितीमध्ये सरपंच अध्यक्ष आहेत व पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, अंगणवाडीसेविका, आशासेविका, शिक्षक हे सदस्य आहेत. कोरोना आपत्ती सुरू झाल्यापासून किती दिवस कृषी सहायक, तलाठी व शिक्षक गावात हजर होते, याची प्रशासनाने तपासणी करावी. गावातील कोरोना समितीचे सर्व सदस्य गावात आल्याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय उघडू नये, अशी भूमिका सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांनी घ्यावी, असे आवाहन तात्यासाहेब पाटील यांनी केले आहे.