विलास जळकोटकर, सोलापूर : हॉटेल व लॉजिंग सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आणि नाहरकत दाखला देण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या अकोले काटीच्या ग्रामसेविका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. सोमवारी पथकाने त्यांना रंगेहात पकडले. कीर्ती अर्जुनराव वांगीकर,(वय ४३ वर्षे) असे कारवाई झालेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे.
यातील प्राप्त तक्रारदारास अकोले काटी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हॉटेल व लॉजिंग सुरू करायचे होते. यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी ग्रामसेविका किर्ती अर्जुनराव वांगीकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार सोमवारी (दि. १७) ही रक्कम पंचायत समिती उत्तर सोलापूर या कार्यालयात स्वतः स्वीकारली. दरम्यान लाचलुचपतच्या पथकाने अगोदरच सापळा लावला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मल्लिनाथ चडचणकर, हवालदार शिरीषकुमार सोनवणे, रशीद बाणेवाले, श्रीराम घुगे, राजू पवार, राहुल गायकवाड यांनी केली.