याबाबत मोहोळ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पोपटराव पाटील (रा. लिंक रोड, समतानगर, पंढरपूर) हे पेनूर येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या ऑफिसमध्ये दैनंदिन कामकाज करीत होते. याच वेळी माजी सरपंच श्वेता राजगुरु व त्यांचे पती राजू बजरंग राजगुरु हे दोघेही कार्यालयात आले. राजू राजगुरु यांनी तुम्ही गावातील समाजमंदिराचे काम माझी पत्नी सरपंच असताना या काळात करून दिलेले नाही व ग्रामपंचायत इमारतीचे कामसुद्धा त्या कालावधीमध्ये पूर्ण करून दिले नाही, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करून ग्रामसेवकाच्या गालावर चापटा मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यावेळी माजी सरपंच श्वेता राजगुरु व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करत वाद मिटवला तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद ग्रामसेवक पाटील यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी राजू राजगुरु यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार लोबो चव्हाण करीत आहेत.
----