मंगळवेढा : येथील बालाजी नगरातील अंगणवाडी शाळेच्या वॉल कंपाउंडच्या केलेल्या कामाच्या बिलाचा ९७ हजारांचा चेक देण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी करून १५ हजार रुपयांची लाच पंचायत समिती कार्यालयात मध्यस्थामार्फत स्वीकारताना अर्चना लक्ष्मण केंदुळे (वय ३६ वर्षे, रा. गुंगे गल्ली) या महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान, ही ग्रामसेविका चार वर्षात दुसºयांदा लाचलुचपतच्या जाळ्यात अडकली आहे.
तक्रारदारांनी १४ व्या वित्त आयोगांतर्गत बालाजी नगर येथील अंगणवाडीच्या वॉल कंपाउंडचे काम केले आहे. या कामाच्या बिलाची रक्कम ९७ हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी अर्चना लक्ष्मण केंदुळे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम मध्यस्थामार्फत स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
दरम्यान, यापूर्वी ३ नोव्हेंबर २०१४ साली मल्लेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बिगरशेती करण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अरुण देवकर, सहायक फौजदार जाधवर, पोलीस हवलदार पवार, पोलीस शिपाई स्वामी, जानराव यांनी केली. तपास पोलीस निरीक्षक कविता मुसळे करीत आहेत.