सांगोला येथील पृथ्वीराज प्रमोद कोडग (१८) या विद्यार्थ्याचा रविवारी वडिलांच्या वाढदिवसादिवशीच सांगोल्यातील एका स्वीमिंग टँकमध्ये पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामुळे प्रमोद कोडग कुटुंबीय दुःखात बुडाले होते. पै-पाहुणे, नातलग त्यांचे सांत्वन करत असताना मात्र आजोबा विठ्ठल कोडग यांना काहीही सांगितले नव्हते.
दोन दिवस झाले घरात पै-पाहुणे, नातलग एकत्रित येऊन रडत आहेत, तर नातू पृथ्वीराज कोठे दिसत नाही म्हणून मुलगा प्रमोद यांच्याकडे सतत विचारणा केली असता त्यांनी पृथ्वीराजचा मुत्यू झाल्याचे सांगताच आजोबांना धक्का बसला. त्यामुळे सोमवारी त्यांनी राज.. राज.. करत रात्रभर अश्रू ढाळत टाहो फोडतच ते कोमात गेले. नातेवाइकांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र, त्यांनी उपचाराला प्रतिसादच दिला नाही. नातवाच्या मुत्यूनंतर तिसऱ्या दिवशीच आजोबाचाही मुत्यू झाला. या घटनांमुळे कोडग कुटुंबावर प्रचंड आघात झाला आहे.
आजोबाचा देहदान
विठ्ठल कोडग यांनी सोलापूर येथील डॉ. वैशंपायन मेडिकल कॉलेजकडे फाॅर्म भरून देहदानाचा संकल्प केला होता. मुलगा प्रमोद कोडग यांनी मेडिकल कॉलेजशी संपर्क साधून तसे कळविले. परंतु, मुत्यूनंतर आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असल्यामुळे नातेवाइकांनी त्यांच्यावर मंगळवारी रात्री १० वाजता सांगोल्यातच अंत्यसंस्कार केले.