अय्युब शेख
माढा : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरले होते़.. कोणाचा पायपोस कोणाला नव्हता.. पोलीस सुरक्षा जवान आपलं कर्तव्य बजावत होते़..या हल्ल्यादरम्यान हॉटेल ताजमध्ये विशेष आॅपरेशन मोहीम राबविण्यात येत होती़..त्याच दरम्यान अतिरेक्यांशी मुकाबला सुरू असताना अचानक एक ग्रेनेड आला.. त्यात बटालियन १० मधील जवान राहुल सुभाष शिंदे हे शहीद झाले़.. आज जन्मगावी सुलतानपूर येथे अत्यंत देखणे स्मारक उभारले आहे़ त्यांच्या त्या स्मारकाच्या कट्ट्यावर बसून आजोबा विष्णू शिंदे हे नातू राहुल यांच्या शौर्याची गाथा युवापिढीपुढे मांडत असल्याचे दिसून आले.
शेती पिकत नसल्याने सुलतानपूरचा (ता़ माढा) सुभाष शिंदे या शेतकºयाचा मुलगा राहुल पोलीस भरतीचा निश्चय केला होता. मित्रांबरोबर भरतीला गेल्यानंतर एस़ आऱ पी़ मध्ये पोलीस शिपाई म्हणून त्याची निवड झाली़ सोलापुरात प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर कर्तव्य बजावण्यासाठी त्याला मुंबईला पाठवण्यात आले होते़.
दरम्यान २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावर अतिरेक्यांनी सशस्त्र हल्ला केला. संपूर्ण मुंबईला वेठीस ठेवण्याचा प्रयत्न अतिरेकी करत असताना भारतीय जवानांनी १० पैकी नऊ अतिरेक्यांना यमसदनी पाठविले़ हॉटेल ताजमध्ये अतिरेकी शिरल्याची खबर मिळाल्यानंतर मुंबईचे तत्कालीन उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक विशेष मोहिमेअंतर्गत दाखल झाले होते. नांगरे-पाटील जवानांना सूचना देत होते. ते अतिरेक्यांशी मुकाबला करीत नागरिकांना, महिलांना व लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवित असताना अतिरेक्यांकडून ग्रेनेडचा स्फोट झाला. त्यामध्ये जवान राहुल शिंदे हे शहीद झाले.
राहुल शिंदे यांचे आजोबा विष्णू सोपान शिंदे, आजी स्वरूप विष्णू शिंदे, वडील सुभाष विष्णू शिंदे, आई साखरबाई सुभाष शिंदे, लहान भाऊ प्रवीण, बहीण वर्षा असा मोठा परिवार आह़े राहुल शिंदे याचे बलिदान हे देशवासीयांना प्रेरणादायी ठरले आहे.
सुलतानपूरचे ‘राहुल नगर’ नामकरण करा- २६ डिसेंबरच्या हल्ल्यात माझा मुलगा राहुल शिंदे हा शहीद झाला. आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजसुद्धा सुलतानपूर गावाला शहीद राहुल शिंदे हे नाव द्यावे यासाठी आम्ही शासकीय कार्यालयात पायपीट करीत आहोत. माढा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्रव्यवहार झाला आहे. या गावाला इतर कोणतीच पार्श्वभूमी नाही. नाव बदलल्यावर कोणताच समाज दुखावणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतीने चार वेळा दिला आहे़ प्रत्येक वर्षी कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाºया नेतेमंडळीकडून केवळ आश्वासनच मिळते आहे. अंमलबजावणी करुन गावाला राहुलनगर हे नाव द्यावे, अशी मागणी वीरपिता सुभाष शिंदे यांनी केली आहे.