शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : तालुक्यातील बावी (आगलावे) तसं पूर्वी संवेदनशील गाव; मात्र गेल्या काही वर्षांपासून शांत झाले आहे. गावाला यंदा जिल्हा परिषदेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. ग्रामपंचायतीवर वीस वर्षांपासून आमदार राजेंद्र राऊत गटाची सत्ता आहे. त्यामुळे या काळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आमचीच सत्ता येणार असा सत्ताधारी दावा करीत आहेत, तर दुसरीकडे सर्वाधिक काळ सत्ता असल्याने नाराजांची संख्या जास्त आहे. सत्ताधारी पारदर्शी कारभार करीत नाहीत, असा दावा करीत विरोधकांनी परिवर्तनाची हाक दिली आहे.
चुरशीने होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. गावात ११ सदस्यसंख्या असून, यापैकी सत्ताधारी गटाची एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. खंडोबा हे गावचं ग्रामदैवत. लोकवर्गणीतून गावकऱ्यांनी भव्य असे मंदिर बांधलेले आहे. सत्ताधारी गटाने ग्रामदैवत श्री खंडोबा विकास आघाडीच्या माध्यमातून दहा उमेदवार उभे केले आहेत. मेजर मच्छिंद्र फोपले, डॉ. लहू आगलावे, समाधान डोईफोडे, रवीदादा लोंढे, प्रताप मिठे, मधुकर आगलावे, रामचंद्र आगलावे, पिंटू लोंढे हे या आघाडीचे नेतृत्व करीत आहेत.
गावातील दोन्ही गटांच्या तरुणांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. वीस वर्षांच्या काळात संपूर्ण गावात क्राँक्रीट रस्ते, पूर्ण गावात भुयारी गटारी, पाच अंगणवाड्यांना इमारती, मिनी अंगणवाडी, शाळेची दुरुस्ती, तालमीचे नूतनीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती, गावात सर्वत्र सौर व हायमास दिवे, स्मशानभूमीला सरक्षक भिंत, आदी सर्व विकासकामे केली आहेत. गावाला तलाव, तीन विहिरी, बोअर, आदी ११ स्रोतांच्या आधारे मुबलक पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे विकासकामांच्या जोरावर गावकरी आम्हाला संधी देतील, असे भाजपचे सरचिटणीस निवडणुकीतील उमेदवार पिंटू लोंढे म्हणतात.
तर विरोधी माजी आमदार सोपल गटाने खंडोबा महाविकास युवा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी गटाला आव्हान दिले आहे. हरिभाऊ पाटील, नागनाथ आगलावे, राहूल आगलावे, किरण आगलावे, संभाजी पाटील, गोकुळ आगलावे, भीमराव पाटील, गोवर्धन पाटील, अमोल झिंगे, दयानंद व अशोक लागलावे हे नेतृत्व करीत आहेत. गावात वीस वर्षे विरोधकांची सत्ता आहे. त्यांनी विकासकामे केली आहेत. मात्र, त्यात गुणवत्ता नाही. मनमानी सुरू आहे. गावात बसची सोय नाही. सत्तेच्या जोरावर ते आमच्या उमेदवारांवर दबाव आणतात. त्यामुळे आम्ही केवळ पारदर्शी कारभार हा मुद्दा घेऊन निवडणूक लढत आहोत. जास्त दिवस सत्ता असल्याने नाराजांची संख्या जास्त आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल, असे गजेंद्र उंबरे म्हणाले.
जिल्हा परिषद सदस्या डोईफोडे यांचा मुलगा समाधान डोईफोडे स्वत: निवडणूक लढवत आहेत. दोन्ही गटांनी अद्याप प्रचाराचा नारळ फोडला नसला, तरी गाठीभेटींवर भर दिला आहे. सोशल मीडिया व होम टू होम प्रचार सुरू आहे.
----
प्रचारातील मुद्दे - आम्ही वीस वर्षे सत्तेच्या बळावर गावात पायाभूत विकासाची सेवा दिली आहे. त्या बळावर आम्हाला जनता पुन्हा संधी देईल. जनतेचा विकास हाच आमच्या प्रचारातील मुद्दा असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
- गावात वीस वर्षे विरोधकांची सत्ता आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांत गुणवत्ता नाही. मनमानी सुरू आहे. गावात बसची सोय नाही. सत्तेच्या जोरावर ते आमच्या उमेदवारांवर दबाव आणतात. त्यामुळे आम्ही केवळ पारदर्शी कारभार हा मुद्दा घेऊन निवडणूक लढत आहोत.
-----
बावी ग्रामपंचायत
एकूण सदस्य - ११, एक जागा बिनविरोध
एकूण मतदार - २५६६,
प्रमुख लढत खंडोबा विकास आघाडी विरुद्ध खंडोबा युवा परिवर्तन आघाडी
-----