सोलापूर : मुलांपासून दूर गेलेले आई-वडील शाळेतील कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र यावेत आणि त्यांना नातवंडांकडून प्रेम मिळावे यासाठी राज्य शासनाने अध्यादेश काढून शाळा-शाळांमधून आजी-आजोबा दिवस साजरा करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार सोलापुरातील श्री मल्लिकार्जुन प्रशालेतील कार्यक्रमात आजी-आजोबा नातवंडांसमवेत रमली तर तिकडे पोटच्या मुलांना आई-बाबांचे महत्व कळले.
राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार दरवर्षी हा आजी-आजोबा दिवस १० सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. मात्र चालू शैक्षणिक वर्षात तो दिवस साजरा करण्याचा निर्णयही झाला. त्यानुसार मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये शनिवारी हा दिवस उत्साहात साजरा झाला. नातवंडांनी आपल्या आजी-आजोबांना घेऊन शाळेत आले. त्यांच्यासमवेत काही खेळही खेळले. आजी-आजोबांना नातवंडांनी प्रेम दिले की दुरावलेली मुलंही त्यांच्याजवळ येतील, असा संदेश मुख्याध्यापक वैजिनाथ हत्तुरे यांनी दिला. आजी-आजोबांच्या पाया पडून नातवंडांनी त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले. ‘आजी-आजोबा, तुम्ही चिंता करु नका. आम्ही तुमचा सांभाळ करतो, असे नातवंडांनी सांगताना उपस्थित मंडळी गहिवरली होती.