रविवारी दुपारनंतर, तर काही ठिकाणी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने काढणी झालेल्या ज्वारी, गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले. पावसाच्या थेंबामुळे काढून जमिनीवर टाकलेल्या ज्वारीची कणसे काळी पडण्याची शक्यता आहे. जमिनीवर पडलेल्या ज्वारीच्या कणसांमध्ये पावसाच्या थेंबाबरोबर माती मिसळण्याची अधिक शक्यता आहे. दोन दिवस पावसाचे वातावरण असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती, तरीही आधीच ज्वारीची काढणी केलेल्या शेतकऱ्यांना या अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसला.
सोमवारी सायंकाळी सोलापूर शहर परिसरात दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री विजांचा कडकडाट सुरू होता. तब्बल २० मिनिटे हा पाऊस सुरू होता. शहराभोवताली शेळगी, कारंबा, हत्तूर, देगाव, तिऱ्हे आदी गावांच्या परिसरातील द्राक्षबागांचे नुकसान झाले. 25 टक्के द्राक्ष बागा आता काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. द्राक्ष घडावर पाऊस पडल्याने घडांत पाणी साठून मणी तडकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.
------
कडबा काळा पडण्याची शक्यता
ज्वारीची काढणी करून ती जमिनीवर टाकलेल्या कडव्यावर पाऊस पडल्यास हा कडबा काळा पडतो. काळा पडलेला कडबा जनावरांसाठी खाण्यालायक नसतो. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात काही ठिकाणी ज्वारीची पेरणी उशिराने झाली होती. अशा पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. ज्वारीची कणसे मोडून टाकण्यात आली आहेत. पावसाने या कणसामध्ये पाणी साठल्यास संपूर्ण ज्वारीची रास खराब होऊ शकते.
-----
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. पिकांचे नुकसान झाले आहे; परंतु त्याची अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. तालुका कृषी कार्यालयांकडून माहिती संकलित केली जात आहे.
- रवींद्र माने, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर.
-------
भाजीपाल्याचे नुकसान
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याला बसला आहे. कोथिंबीर, पालक, मेथी भाज्यांचे नुकसान झाले आहे. काढणी करून पेंढ्यांची बांधणी करण्याच्या अवस्थेत असलेल्या भाज्या खराब झाल्या. त्यामुळे मंगळवारी पालेभाज्यांची आवक काहीशी मंदावली होती.
------
कांद्याची नासाडी
अचानक पाऊस पडल्याने रानात टाकलेल्या कांद्याचे नुकसान झाले. पात कापलेल्या कांद्यावर या पावसाचा जास्त परिणाम होणार आहे. पाऊस पडल्याने कांद्यावर पाणी साठल्याने हा कांदा नासून खराब होण्याची भीती अधिक आहे. गाफील राहिलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.
-----