सोलापूर - कोरोना महामारीच्या संकटात मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते, कोविड योद्धा, संवेदनशील व्यक्ती, तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यत सर्वचजण झटताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यात 'मदतीचा एक घास' या उपक्रमांतर्गत लॉकडाऊन काळात गरीब, गरजू, बेघर आणि झोपडपट्टीतील रहिवाशी नागरिकांचं पोट भरण्याचा संकल्पन सोलापूर काँग्रेसने हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात करताना, स्वत: आमदारप्रणिती शिंदे यांनी पोळ्या लाटून जेवण बनवलं.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस प्रभारी आ. प्रणिती शिंदे यांनी स्वतः च्या घरी पोळ्या आणि भाजी बनवून ह्या उपक्रमाची सुरवात केली. एक आई, एक बहीण, एक गृहिणी आणि अन्नपूर्णाचा वसा काँग्रेसच्या महिला आणि नेत्या पूर्ण करु शकतात, हे आज त्यांनी दाखवून दिले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल कडून राबवण्यात येणाऱ्या "मदतीचा एक घास" ह्या उपक्रमा द्वारे आता गरजू लोकांना मिळणार आहे. घरचे जेवण, आपण घरात ज्या पोळ्या करतो, त्यात रोज 10 पोळ्या जास्त करायच्या आणि पाव भर भाजी जास्त करायची, अशी ही संकल्पना आहे. महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोळ्या, चपाती आणि भाजी जमा करुण गरजू लोकांपर्यंत पोहोचावयी, असेही सांगण्यात आले आहे.
सोलापूर काँग्रेसच्या वतीने मोठ्या हिरिरीने या संकल्पनेत सहभाग घेण्यात येत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे प्रणिती शिंदे यांनी स्वत: पोळ्या लाटून स्वयंपाक बनवित आपल्या घरापासून या उपक्रमाची सुरुवात केल्यामुळे कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून कामगार वस्ती, झोपडपट्टी भागातील लोकांसाठी प्राधान्याने डबा पोहचविण्यात येणार आहे.