सोलापूर - ऊन, वारा, पाऊस, दिवस-रात्र अशा एक ना अनेक संकटांची तमा न बाळगता २४ तास जनतेच्या सेवेसाठी खडा पहारा देणाऱ्या ३० अधिकारी अन् २९६ अंमलदारांनी जीवघेण्या कोरोना आजारावर मात केली आहे. दरम्यान, १ अधिकारी, ४ कर्मचार्यांना मात्र कोरोनाला हरविण्यात अपयश आले. सध्या १ अधिकारी व ७ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रस्त्यावर, चौकाचौकात नाकाबंदी करून रात्रंदिवस एक करीत युद्धपातळीवर खबरदारीसाठी सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहेत. हे काम करीत असताना कित्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येताच सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलिसांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढीच्या गोळ्या देऊन खबरदारीसाठी चांगले प्रयत्न केले होते. खबरदारी घेऊनही कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली व ती आजही सुरू असल्याचे दिसून येत आहे.
तिघांना मिळाली ५० लाखांची मदत
कोरोना काळात मृत्यू झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने प्रत्येकी ५० लाखांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलीस दलात आतापर्यंत १ अधिकारी व ४ कर्मचाऱ्यांचा काेरोनाने मृत्यू झाला होता, त्यापैकी तिघांना प्रत्येकी ५० लाखांची मदत शासनाकडून मिळाली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते संबंधितांना ती मदत सुपूर्द करण्यात आली.
३३९ पोलिसांना कोरोनाची लागण
बंदोबस्त, नाकाबंदी, क्वारंटाइन सेंटर, प्रतिबंधित क्षेत्र, गस्त आदी ठिकाणी अहोरात्र काम करीत असताना ३३ पोलीस अधिकारी व ३०७ अंमलदारांना कोरोनाची लागण झाली. मात्र, वेळेवर उपचार, वरिष्ठांकडून नियमित तब्येतीविषयी विचारणा, अशा एक ना अनेक चांगल्या गोष्टींमुळे ३० अधिकारी व २९६ पोलिसांनी कोरोनावर मात केली.
बंदोबस्त, नाकाबंदी, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करताना लोकांचा संपर्क येतो, त्यातूनच पोलिसांना कोरोनासारख्या महाभयंकार आजाराला सामोरे जावे लागत आहे. तरीही वेळेवर औषधोपचार, वरिष्ठांकडून दरराेज तब्येतीविषयीची विचारणा होत असल्यामुळे बरेच पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय पोलिसांच्या मदतीसाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सोलापूर अन् पंढरपुरात कोविड मदत केंद्राची उभारणी केली आहे.
- अतुल झेंडे,
प्रभारी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलीस.