- (महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय गडबड-घोटाळ्याची वार्ता कर्णोपकर्णी हस्तिनापूर नरेश धृतराष्ट्रच्या दरबारी पोहोचली. दररोजच्या घडामोडीने साºया दरबारात एकच कुजबूज.. महाराष्ट्रत नेमकं चाललंय तरी काय? महाराज धृतराष्ट्रच्या आगमनाची कोणालाच खबरबात नाही.)
- धृतराष्ट्र : (चिडलेल्या अवस्थेतच) प्रधानजी काय चाललंय हे.
- प्रधानजी: (सारेच उठून मुजरा करीत) क्षमा असावी महाराज! तिकडे महाराष्ट्र नामक राज्यात भलतीच धमाल सुरूय म्हणे.
- धृतराष्ट्र : हो, पण त्याचा इथं काय संबंध?
- प्रधानजी : महाराज, महाराष्ट्रात खुर्चीसाठी साºयाच पक्षात बंडाळी माजलीय. अनेकांची शकले उडालीत.. ‘खुर्चीसाठी कायपण’ असा कोलांट उड्याचा खेळ सुरू झालाय. आपलं बूड शाबूत ठेवण्यासाठी सारा खटाटोप सुरूय. छप्पन इंच छातीचं अन् विदर्भाच्या वाघाच्या चाणक्य नितीनं उलथापालथ सुरु आहे. म्हणून ‘ सर सलामत तो...’ असंच काहीसं चित्र दिसू लागलंय... म्हणून म्हणतो तिथला ‘आँखो देखा हाल’ आपल्याला कळला पाहिजे. दरबारातले खास विश्वासू, दिव्यदृष्टीफेम संजयांकडून समजला तर आपल्यालाही त्यांच्या नीतीचा लाभ होईल.
- धृतराष्ट्र : (दाढी कुरवाळत) प्रधानजी आता समजलं, तुम्हाला काय म्हणायचंय ते. ( दिसत नसले तरी आजूबाजूला नजर टाकत) वत्सा संजया... कुठे आहेस तू?
- संजय : (महाराजांना मुजरा करीत) प्रणाम महाराज!
- धृतराष्ट्र: वत्सा, तुझ्या दिव्यदृष्टीने दर्शन घडव महाराष्टÑाचं.
- संजय: (मान डोलावत) जशी आपली आज्ञा महाराज!
- धृतराष्ट्र बोल, कुठून सुरुवात करतोस?
- संजय: महाराज, सोलापूर नामक जिल्ह्यातूनच सुरुवात करतो. (डोळे मिटत) महाराज, इथंतर साराच घोळ सुरू आहे.
- धृतराष्ट्र: म्हणजे रे काय?
- संजय: समर्थाच्या नगरीत बरंच झांबल झांबल सुरुय. मिनतवारी करुनही हाती काही लागलं नाही शेवटी अण्णाला बॅक टू पॅव्हेलियन परतावं लागलं. इथं कोणाचा थांगपत्ता कोणाला लागेनासा झालाय. बिलंदर प्रजेलाही कोणाला वाट्याण्याच्या अक्षता लावायच्या याचं चांगलंच कसब आहे. सिद्धरामेश्वराच्या नगरीत आता ‘कोठे’ जाऊ ‘विजय’ साधण्यासाठी. फिल्डिंग कशी लावायची यासाठी कूटनीती वापरली जाऊ लागलीय.
- धृतराष्ट्र: सैराट नगरात वातावरण तापलंय म्हणे.
- संजय: हो बरोबराय महाराज. तिथंही सारं अस्थिर दिसतंय. आज एक तर उद्या दुसरीच खबर कानी येऊ लागलीय. कार्यकर्त्यांना कोणता झेंडा हाती घेऊ अशी स्थिती दिसतेय.
- धृतराष्ट्र: अरे वत्सा त्या पांडुरंगाच्या दरबारात काय चाललंय?
- संजय: महाराज तिथलं तर काय विचारू नका, तिथं नानानं लंगोट बांधून कमळाच्या पाखळ्याशी सलगी करायचा चंग बांधला खरा; पण पुढचा तर टाईम साधावा म्हणून त्यांनी हातात घड्याळ बांधून घेतलंय. नाही नाही म्हणत थोरल्या पंतानं मात्र इथं बाजी मारलीय. आता रणांगनात कोणी बाजी मारतंय बघू.
- धृतराष्ट्र: अन् मग बाकीचे टिव टिव करणारे कुठं गेले.
- संजय : बाकीचे ‘मनसे’ पूछ रहे हैं अब मैं क्या करु..
- धृतराष्ट्र: अजून कुठं कुठं काय चाललंय सांग बरं..
- संजय: कुठलं कुठलं सांगू महाऽऽराज, साºयांना एकच चिंता लागून राहिलीय, भले आमदारकी नसू दे पण आहे ते कसं शाबूत ठेवायचं याची चिंता लागून राहिलीय. नसती इडा पिडा नको म्हणून सारा खटाटोप सुरूय.
- धृतराष्ट्र : म्हणजे रे काय?
- संजय: कमावलेलं सारं एका रात्रीत गमवू नये म्हणून खटाटोप.
- धृतराष्ट्र : म्हणजे मी कौरवांना सारखं सांगतोय..पांडवांच्या नादी लागू नका, नाहीतर हाय ते गमावून बसाल, तसंच ना!
- संजय: अगदी बरोबर बघा महाराज!
- धृतराष्ट्र: झालं का? तुझं आणखी काय ?
- संजय: महाराज सांगायला अख्खी रात्र सरंल. मामा, अण्णा, दादा, मालक सारे बेरजेचं राजकारण करण्यात मश्गुल आहेत. सीनापट्ट्यात दादानं एकदाचा धनुष्यबाण पटकावलाय. डाळिंब पट्ट्यात बापू लंगोट बांधून तयार आहेत तर साह्येबांना पुन्हा गळ घालणं सुरूय. गावोगावचे मालकलोक आपली मूठ कशी ताब्यात राहील याचाच विचार करू लागलेत... जाऊ द्या दुपार झालीय आता सर्वांच्या पोटात कावळे ओरडू लागलेत.. मगापासून राणीसाहेबांचा दोनदा आतून आवाज आलाय. बाकीचं पुन्हा बोलू यात. तूर्त एवढंच पुरं.
सर सलामत तो...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 4:17 PM