मोहोळ : तालुक्यातील पांडवाची पोफळी शिवारात एका किराणा दुकानदाराने दुकानाच्या मागेच गांजाची झाडे लावण्याचे निदर्शनास आले.हा प्रकार २१ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोपट नवनाथ कोळी असे या संशयित आरोपीचे नाव आहे.
कोळी याने आपल्या दुकानाच्या मागे गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद शिवाजी डावरे यांनी धाड टाकली. तेव्हा कोळी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररीत्या गांजासदृश झाडाची लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासना केल्याचे लक्षात आले. घटनास्थळी सुमारे आठ हजार रुपये किमतीची आठ लहान-मोठी गांजासदृश झाडे मिळून आली. ही झाडे जप्त करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे हे करीत आहेत.