सोलापूर : एकीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रेशन बंद केले आहे. दुसरीकडे धान्यावर जीएसटी लावल्याने अंगणवाडी कर्मचारी खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे सरकारने मानधनात वाढ करावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली.
गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रातील सुमारे दोन लाख कर्मचारी तर जिल्ह्यातील नऊ हजार अंगणवाडी कर्मचारी यांनी संपात सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचारी दररोज धरणे व निदर्शने करीत आहेत. सोमवार २७ फेब्रुवारी रोजी संपाच्या आठव्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धान्य, कडधान्य, तेल, दूध यांचे दर बाजारात खूप वाढलेले आहेत. तुटपुंज्या मानधनातून सर्व वस्तू बाहेरून त्या विकत घेऊ शकत नसल्याचे सांगितले.
निदर्शनामध्ये संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधनात भरघोस वाढ करा, कामासाठी लागणारा चांगला मोबाईल द्या सेवानिवृत्तीनंतर पेन्शन द्या, ग्रॅच्युईटी लागू करा अशा घोषणा दिल्या. या मागण्या येत्या अर्थसंकल्पात मंजूर झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रभर या शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.