संताजी शिंदे सोलापूर : गेल्या दीड वर्षात नोटाबंदीची लाट अनुभवायला आली, यातून सावरत नाही तोपर्यंत वस्तू सेवा कर(जीएसटी) लागू करण्यात आला. या प्रकारामुळे राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील उद्योग व व्यापार अडचणीत आला आहे. व्यवसायासाठी लागणाºया खेळत्या भांडवलावर मोठी गदा आली असून, बँकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ‘जीएसटी’मुळे उद्योग, व्यापार अडचणीत आल्याचे मत महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रिकल्चरचे प्रदेशाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
संतोष मंडलेचा सोलापूर दौºयावर आले असता ते लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलत होते. ते म्हणाले, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ८ वाजता देशाला उद्देशून भाषण केले आणि त्यात अचानक ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बंद केल्याचे जाहीर केले. नोटाबंदीच्या संकटातून बाहेर पडत असताना कोणतीही पूर्वतयारी न करता केवळ अट्टाहासापोटी २०१७ मध्ये ‘जीएसटी’ लावण्यात आली. आजही नव्या सिस्टमला जीएसटी प्रणाली समरस झाली नाही. छोटे व्यापारी, उद्योजक त्रस्त झाले आहेत, निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. निर्यातदाराला पैसे द्यावे लागत असल्याने भांडवल गुंतले आहे, त्यामुळे उद्योग, व्यापार अडचणीत आला आहे, असे संतोष मंडलेचा म्हणाले.
व्यापारी आणि उद्योजक भांडवल घेण्यासाठी बँकांकडे जातात, पण काही उदाहरणे समोर येत असल्याने बँकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बँकांकडून भांडवल मिळत नाही. या सरकारने दुप्पट उद्दिष्ट ठेवल्यामुळे इन्कम टॅक्स वाढल्याचे सांगत आहेत. मात्र नवीन आणि नियमित करदात्यांकडून किती प्रमाणात कर प्राप्त होतो, हा संशोधनाचा विषय आहे.
आज व्यापारी आणि उद्योजक आपला व्यापार सुरळीत करू शकत नाहीत, ही स्थिती संपूर्ण भारतात आहे. सर्व शासकीय कार्यालये फक्त कर वसूल करण्याच्या कामात आहेत. मी आरबीआय इम्पॅक्ट कमिटीवर सदस्य असून, छोटे व्यापारी आणि उद्योजक यांना पतपुरवठा सुलभतेने मिळावा म्हणून पाठपुरावा करीत आहे. याबाबत ‘आरबीआय’ ला चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने पत्र देण्यात आले आहे, असेही संतोष मंडलेचा यांनी सांगितले.