सोलापूर : शासनाने उजनी पाणी वाटपाचे नव्याने केलेल्या नियोजनावर सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा तुटून पडले आहेत. शाब्दिक घोळ घालत उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा इंदापूरला पाणी पळविण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही अशी भूमिका प्रतिक्रिया देताना मांडली आहे.
जलसंपदा विभागाने बुधवारी उजनीच्या पाणी वाटपाचे नव्याने नियोजन जाहीर केले आहे. यात सोलापूर जिल्ह्यात सीना, भीमेच्या पात्रात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे वाढल्याने कालव्यातील पाण्याची मागणी घटल्याचे दाखवून मंगळवेढा व इंदापूरच्या लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी वाढविले आहे. माढा, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील योजना अर्थवट असताना कालव्याच्या पाण्याची मागणी नसल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या तालुक्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कायम दुष्काळी असलेल्या या तालुक्याच्या वाटणीचा थेंब मिळाल्याशिवाय पाण्याचे नवीन वाटप करू देणार नाही अशी भूमिका सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी घेतल्याचे दिसून येत आहे.
----
पालकमंत्री कशाला आले?
आमदार विजयकुमार देशमुख यांनी उजनीच्या नवीन पाणी वाटप धोरणाला विरोध असेल असे सांगितले. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात उजनी धरण शून्यावर जाते. मग जिल्ह्यात पाण्याची गरज नाही का. अजून अक्कलकोट, दक्षिणच्या योजना व्हायच्या आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना केवळ इंदापूरला पाणी न्यायचे आहे म्हणून ते सोलापूरला आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व भरणे यांना सोलापूर विषयी काही देणं घेणं दिसत नाही. त्यांनी सोलापूर साठी एकतरी काम केलेले दाखवावे. नव्या नियोजन विरूद्ध आम्ही पुन्हा आंदोलन उभा करू.
-------
नियोजन चुकीचेच आहे
शासनाने उजनी पाणी वाटपाचे नवीन केलेले नियोजन चुकीचे आहे. कालव्याच्या पाण्याची मागणी घटल्याचे त्यांनी दाखविले आहे. कालव्यात पाणीच सोडले जात नाही. पाण्याची मागणी करण्याचे शेतकऱ्यांना माहिती नाही. याचा फायदा घेतला जात आहे. आम्ही या नियोजनाला विरोध करू व हक्काचे पाणी मिळवू असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
---------
अन्याय होऊ देणार नाही
उजनीचे पाणी पळविण्याचा मागे प्रयत्न झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही बाब निदर्शनाला आणून दिल्यावर हा प्रयत्न थांबला. आता नवे नियोजन मी पाहिले. अक्कलकोट, दक्षिणला अजून पाणी मिळालेले नाही. सोलापूरच्या वाट्याचे आधी पाणी येऊ द्या. मगच आम्ही इतरांना पाणी देऊ. इतर लोकप्रतिनिधींनी याचा अभ्यास करावा. मुख्यमंत्र्याकडे हा विषय पुन्हा मांडू अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी मांडली.
---------
नियोजन पाहिले नाही...
याशिवाय मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांना उजनी पाण्याच्या नवीन नियोजनावर प्रतिक्रिया विचारली असता पाटील यांनी नवीन नियोजन माहित नसल्याचे सांगितले. आमदार माने यांनी बाहेर जिल्ह्यात असल्याने नवीन नियोजन पाहिले नसल्याचे स्पष्ट केले