सोलापूर : भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्या राजीनाम्यानंतर शहर भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कुरघोड्यांना वैतागून प्रा.निंबर्गी यांनी राजीनामा दिल्याचा आरोप सहकारमंत्री गटातील पदाधिकाºयांनी केला आहे. प्रदेश कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा स्वीकारु नये, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा गुरुवारी सायंकाळी नगरसेवक आणि पदाधिकाºयांच्या बैठकीत देण्यात आला.
मुदत संपल्याचे कारण देऊन भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी राजीनामा दिला आहे. २२ जून रोजी पक्षाच्या अधिवेशनात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. या वृत्ताने भाजपमधील एक गट अस्वस्थ झाला आहे. पालकमंत्री गटाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, अस्वस्थ झालेल्या भाजपमधील पदाधिकाºयांनी गुरुवारी सायंकाळी शिवानुभव मंगल कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला आजी-माजी नगरसेवकांसह दीडशे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपचे शहर सरचिटणीस हेमंत पिंगळे म्हणाले, प्रा. अशोक निंबर्गी यांच्या निर्णयामुळे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.
काँग्रेस नेत्यासोबत फिरणाºयाला शहराध्यक्ष करणार का?- लोकसभा निवडणुकीच्या काळात काही लोक काँग्रेसच्या नेत्यासोबत फिरत होते. या काँग्रेस नेत्यासोबत फोटो काढत फिरणाºया पदाधिकाºयाला शहराध्यक्ष करण्याचा डाव रचला जातोय. ही गोष्ट भाजपचे कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत. नेत्यांना एवढा माज आला असेल तर विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्ता त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही या बैठकीत अनेकांनी बोलून दाखविल्याचे पिंगळे यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांचा इशारा समजून घ्या : जन्नू - रामचंद्र जन्नू म्हणाले, मंत्र्यापासून वॉर्ड अध्यक्षापर्यंतच्या तक्रारी करण्यासाठी कार्यकर्त्याला प्रा. अशोक निंबर्गी यांचा खांदा शिल्लक आहे. पण कार्यकर्ता मोठा होतोय म्हणून नेतृत्वाला अडचण होत असावी, अशा भावना काही जणांनी या बैठकीत मांडल्या. प्रदेश कार्यकारिणीने प्रा. निंबर्गी यांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा कार्यकर्ते उपोषण आणि अर्धनग्न आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांचा इशारा समजनू घ्यावा.