पालकमंत्री महापाैरांना म्हणाले, तुमचा निराेप अजितदादांना लवकर कळविताे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 01:20 PM2021-09-04T13:20:05+5:302021-09-04T13:20:11+5:30
उड्डाणपूल, जलवाहिनीचा प्रश्न : उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजनाची मागणी
साेलापूर : उड्डाणपुलाचे भूसंपादन व समांतर जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक लावण्यात यावी, अशी मागणी महापाैर श्रीकांचना यन्नम यांनी शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. त्यावर तुमचा निराेप अजितदादांना कळविताे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
महापाैर यन्नम म्हणाल्या, दाेन उड्डाणपुलांच्या भूसंपादनाची रक्कम ३०० काेटींवरून ११७ काेटींवर आली आहे. यातील ८१ काेटी ९० लाख रुपये शासन देणार आहे. महापालिकेला ३५ काेटी १० लाख रुपये भरायचे आहेत. महापालिकेला विशेष बाब म्हणून भूसंपादनाची सर्व रक्कम शासनाकडून मिळावी यासाठी मुख्य सचिवांकडे बैठक झाली. मुख्य सचिवांनी पैसे देण्यास नकार दिला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ही सर्व रक्कम मिळाली तरच उड्डाणपुलांचे काम सुरू हाेईल. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे तातडीने याबद्दल बैठक लावण्यात यावी. लवकरच या बैठकीबाबत अजितदादांना कळवू. हा निर्णय शासन स्तरावरच हाेेणार आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
काँग्रेसमधील नाराजी
मागासवस्ती निधी वाटपात दुजाभाव झाल्याची तक्रार काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण निकाळजे व अजित बनसाेडे यांनी केली. मात्र निवेदन देण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून निकाळजे काही वेळ काँग्रेसचे गटनेते चेतन नराेटे व इतरांवर नाराज असल्याचे दिसून आले. नंतर सामाेपचाराने यावर पडदा पडला.