सोलापूर : प्रलंबित मागण्यासंदर्भात पोलिस पाटलाचे दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. उपोषणस्थळाला गुरूवारी आ. प्रणिती शिंदे व आ.राजेंद्र राऊत यांनी भेट दिली. या भेटीवेळी राऊतांनी थेट पालकमंत्र्यांना फोन लावला. प्रणिती शिंदेंनीही पालकमंत्र्यांना मागण्याबाबत सांगितले. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोनवरून दोन डिसेंबरला मुंबईत बैठक घेऊन येत्या हिवाळी अधिवेशनात मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर पोलिस पाटलांनी उपोषण मागे घेतले.
दरम्यान, पोलिस पाटील यांचे मानधन ६५०० वरून २० हजार करण्यात यावे, पोलिस पाटलांचे नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करावे, प्रवास भत्ता दुप्पट करावा, वयोमर्यादा ६० वरून ६५ करावी, सेवानिवृत्तीनंतर एक रकमी २० लाख रुपये देण्यात यावे या मागणीसाठी पंढरपूर पोलिस पाटील संघटनेचे विजय वाघमारे हे १४ नोव्हेंबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला जिल्ह्यातील सर्वच पेालिस पाटलांनी पाठिंबा दिला. गुरूवारी आंदोलनाची माहिती मिळताच आ. प्रणिती शिंदे, आ. राजेंद्र राऊत यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली. या भेटीत विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर आ. राऊत यांनी थेट पालकमंत्र्यांना फोन लावला. याचवेळी आ. प्रणिती शिंदे यांनीही पोलिस पाटलांच्या मागण्याबाबत पालकमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी थेट फोनवरून आश्वासन देत उपोषण मागे घेण्यास सांगितले. आश्वासन मिळाल्याने पोलिस पाटील याने उपोषण मागे घेतले.