: ‘दत्तात्रय भरणे यांना सोलापूरचा पालकमंत्री केलं गं बया... यांनीच उजनीचं पाणी इंदापूरला नेलं गं बया’ असा आर्त टाहो फोडत महिलांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पुतळा उजनी जलाशयात बुडवून निषेध केला.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेले असून, या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील स्वाक्षरी झालेली आहे. इंदापूरकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात धडकल्या आणि याच निर्णयाविरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये रणकंदन माजले. पालकमंत्री भरणे यांच्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे-पाटील यांनी उजनी धरणात शनिवारी सायंकाळी ४ वाजता आंदोलन करीत पालकमंत्री भरणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची तिरडी करून अंत्यविधी करीत पुतळ्याला उजनी जलाशयात बुडवून निषेध केला.
अतुल खुपसे पाटील म्हणाले, एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे जिल्ह्याला अनाथ करायचे, हा भरणे यांचा दुतोंडी खेळ आहे. भलेही इंदापूरकरांसाठी ही आनंददायी बातमी असली तरी सोलापूर जिल्हावासीयांसाठी वेदनादायी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी महिलांनी ‘भरणेंना सोलापूरचा पालकमंत्री केलं गं बया, यांनी उजनीचं पाणी इंदापूरला नेलं गं बया, मामा असं कसं केलं ओ, आमच्या हक्काचं पाणी का चोरलं ओ, अशा ओव्या गाऊन रडारडी केली. या आंदोलनात विठ्ठल मस्के, राणा महाराज, जयसिंग पाटील, दीपाली डिरे, सुवर्णा गुळवे, दत्ता डिरे, हणू कानतोडे, अतुल राऊत, सूरज कानतोडे यांनी सहभाग नोंदविला.
फोटो
२४कुर्डूवाडी-आंदोलन
ओळी
उजनी जलाशयात पालकमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत त्यांची प्रतिमा उजनी धरणात बुडवून निषेध करताना अतुल खुपसे यांच्यासह आंदोलक.