गुलबर्गा/आळंद : आळंद-गुलबर्गा राज्य महामार्गावर कोडलहंगरगानजीक कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस आणि पिकअप यांच्यात सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १७ जण ठार तर पंधरा जण जखमी झाले आहेत. मृत सर्व जण अक्कलकोट तालुक्यातील तडवळचे रहिवासी आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तडवळ (ता.अक्कलकोट) येथून हे सर्व जण गुलबर्गा येथील ख्वाजा बंदेनवाज दर्गाह येथे जावळ काढण्यासाठी निघाले होते. जखमींवर गुलबर्गा आणि सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नबीलाल मुल्ला कुटुंबीय भल्या पहाटे तडवळहून गुलबर्ग्याकडे निघाले होते. आळंद चेकपोस्ट ओलांडल्यानंतर थोडे अंतर कापल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि १६ जणांचा बळी घेतला. एम. एच. १३, ५८१७ या पिकअपने कर्नाटक परिवहनच्या के. ए. ३४, १०१७ या होस्पेट-जिडगा या समोरुन येणार्या बसला समोरुन धडक दिली. अपघात इतका भीषण होता की बसच्या जोरदार धडकेत पिकअप वाहन फुटबॉलप्रमाणे उडून रस्त्याच्या कडेला पडले. पुढे गेल्यानंतर बसही उलटली. पिकअप वाहनाच्या पुढे बसलेल्यांचा चुराडा झाला होता तर बसचालक बसमध्येच अडकून पडला होता. जेसीबी मशीन आणून त्यास बाहेर काढण्यात आले़ त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. अपघातस्थळी स्वयंपाक करण्यासाठी घेऊन जात असलेले सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. या अपघातानंतर गुलबर्गा व सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील नबीलाल हनिफ मुल्ला यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या अपघातात नबीलाल हनीफ मुल्ला(५८), मैमुनबी नबीलाल मुल्ला (५६), बाशा मदार मुल्ला (७०), रमजान दादामियाँ मुल्ला (२१), मोहसीन सिकंदर मुल्ला (१४), हुसेन मदारसाब मुल्ला (२०), रियान शेख (३), मुमताज महिबूब लावणी (६), बाबू ख्वाजाभाई मुल्ला (४),परवीन सिकंदर मुल्ला (३५), नूरजहाँ रजाक मुल्ला (३०), समीर सिकंदर मुल्ला (५), जन्नत खाजाभाई मुल्ला (३०), रेश्मा खाजाभाई मुल्ला (१०), पिकअपचा चालक कमलाकर शिवप्पा बरगूर (३२) हे जागीच ठार झाले़ इतर दोन जण उपचार चालू असताना गुलबर्गा येथील शासकीय रूग्णालयात मरण पावल्याचे पोलिसांनी सांगितले तर अ. रजाक म. हनिफ मुल्ला (वय ४८) यांचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर या अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अमितसिंग, जिल्ह्याचे पालकमंत्री कमरूल इस्लाम, आळंदचे आमदार बी.आर.पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. आमदार बी. आर. पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीचे आश्वासन दिले. इशान्य कर्नाटक परिवहनकडूनही प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करीत त्यापैकी १५ हजार रुपये प्रभारी कार्यकारी संचालक ए. एम. खानप्पनवर यांनी मृतांच्या कुटुंबियांना दिले.
-------------------
वाहनांच्या धडकेमुळे डिझेल टाकीला आग
दोन्ही वाहनाच्या जोराच्या धडकेमुळे डिझेल टाकीला आग लागली होती पण अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आणली. बसमध्ये वाहक आणि अन्य चार प्रवाशी होते. त्यापैकी वाहकास किरकोळ जखम झाली. अपघात स्थळी बघ्यांची गर्दी वाढली होती. बकरा बचावला गुलबर्गा येथे जावळ कार्यक्रमासाठी घेऊन जात असलेला बळीचा बकरा मात्र या अपघातातून बचावला आहे. ज्याचा बळी द्यावयाचा आहे, तो बचावला मात्र बळी देणारे १७ जण या अपघातात दगावले गेले.
---------------------
१२ जखमींवर सोलापुरात उपचार
या अपघातातील १२ जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले आहे. त्यात सादिया बुºहाण मुल्ला (वय ३), आमन बुºहाण मुल्ला (७), आस्मा बुºहाण मुल्ला (४), विजयकुमार सिद्राम कोळी (२८), आयेशा सिकंदर मुल्ला (१७), साफिया मुल्ला (२), तनुजा कासीम शेख (१६), मालन नबीलाल मुल्ला (१८), अमीना म. आरिफ मुल्ला (७0), सिकंदर म. हनिफ मुल्ला (४५), हजरतबी बुºहाण मुल्ला (२८),सद्दाम नबीलाल मुल्ला (३0, सर्व रा. तडवळ) यांचा समावेश आहे. अपघातातील रुग्ण वाढल्यामुळे शासकीय रुग्णालयातील अपघात विभागात धावपळ उडाली. रुग्णालयास खा. अॅड. शरद बनसोडे यांनी भेट दिली. अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांना त्यांनी उपचाराबाबत सूचना केल्या.