सोलापूर : टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून २७ सप्टेंबर रोजी झालेल्या टॉवेलच्या मानवी साखळीच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. शुक्रवारी (ता. ५) रात्री हा विक्रम झाल्याची घोषणा गिनीज बुकने केली. शहरात २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान व्हायब्रंट टेरीटॉवेलचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन झाले होते. या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून हा विक्रम करण्यासाठी लिंगराज वल्याळ मैदानावर सोलापूरकरांनी हजेरी लावली होती.
या विक्रमाच्या माध्यमातून शहराचे नाव जगभर पोहोचविण्यासाठी सोलापूरकरांनी सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दोन हजार ४८ लोक उभे राहत टॉवेलच्या साखळीने आपल्यातल्या एकतेचा प्रत्यय दिला होता.
विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. पांढºया रंगाच्या कपड्यांचा पेहराव, हातामध्ये पांढºया रंगाचा टॉवेल पकडून उभे राहत सुमारे चार तास सोलापूरकरांनी कष्ट घेतले होते. नियोजनासाठी स्वयंसेवकांनीही मेहनत घेतली. मैदानात पावसाचे पाणी, चिखल असूनही नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. उपक्रमाची निर्धारित वेळ पूर्ण झाल्यानंतर मैदानावर जल्लोष करण्यात आला होता.
सोलापूरकरांनी घेतलेल्या कष्टाची नोंद गिनीज बुकने घेतल्याने आता खरा जल्लोष करण्याची संधी आहे.
परीक्षणासाठी ड्रोनचा वापर- २०१५ मध्ये इटलीमध्ये लोंगेस्ट ह्यूमन टॉवेल चेनचा विश्वविक्रम करण्यात आला होता. या विक्रमात एक हजार ६४६ माणसांनी टॉवेल पकडून मानवी साखळी केली होती. आता हा विक्रम सोलापूरकरांनी मोडला आहे. सोलापूर हे टेरीटॉवेल उत्पादनात सुप्रसिद्ध आहे. जागतिक स्तरावर याची नोंद व्हावी, यासाठी इटलीच्या विक्रमापेक्षा अधिक फरकाने टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित दोन हजार ४८ माणसांची टॉवेल साखळी उभी करण्यात आली होती. परीक्षणासाठी ड्रोन कॅमेºयाचा वापर करण्यात आला. या विक्रमावर आता सोलापूरचे नाव कोरले आहे.
टॉवेलचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सोलापुरात आयोजित केले होते. याला जगात आणखी चांगली प्रसिद्धी मिळावी, या उद्देशाने मानवी टॉवेलची साखळी करण्यात आली होती. आता टेक्स्टाईल क्षेत्रात सोलापूरचे नाव जगात होणार आहे. असा उपक्रम घेण्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न करत होतो. त्याला आता गिनीजची पावती मिळाल्याने खूप आनंद होत आहे. या विक्रमासाठी सोलापूरकरांनी घेतलेल्या कष्टाला सलाम. - राजेश गोसकी, अध्यक्ष, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन