सोलापूर : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याच्या सभेतील निर्णयाला गुरुजनांतून विरोध होत आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली असून, ड्रेसकोडमधून काय साध्य होणार, असा सवाल उपस्थित करीत शाळांच्या गुणवत्तेच्या पाहणीकडे लक्ष वेधले आहे.
जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असणाºया दहा हजार शिक्षकांमधून याबाबत प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने शिक्षकांना ड्रेसकोड सक्तीचा केला होता. शिक्षकांना रेषा असलेला गुलाबी रंगाचा शर्ट आणि पांढरी पॅन्ट आणि शिक्षिकांना गुलाबी साडी असा ड्रेसकोड केला होता. पण अलीकडच्या दोन वर्षांत ड्रेसकोडमध्ये शिथिलता आली. जि. प. सदस्य सचिन देशमुख यांनी मंगळवारच्या सभेत याकडे लक्ष वेधले. सर्वांनीच ही सूचना उचलून धरल्यावर ड्रेसकोड लागू करण्याचा ठराव संमत करण्यात आला. पण याबाबत शिक्षक संघटनांशी चर्चा करावी, असे नमूद केले आहे. असे असताना आता शिक्षक संघटनांनी ड्रेसकोडबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे.
कार्यावरुन गुरुजनांना सामाजिक प्रतिष्ठा मिळालेली असते. शाळेमध्ये गुरुजनांची इतरांना ओळख व्हावी, यात काहीच स्वारस्य नसते. त्यामुळे सदस्यांनी शिक्षकांच्या कामांची उपहासात्मक चर्चा न करता चुका होत असतील तर कारवाई करावी. मात्र गुरुजन विद्यार्थीप्रती किती सजग आहेत, याचीही चाचपणी करावी. पुरेसे साहित्य नसताना लोकनिधी व प्रसंगी स्वखर्च करून अनेकांनी शाळांची गुणवत्ता वाढविली आहे. डिजिटल स्कूल, अध्ययन, अध्यापन असे उपक्रम पदरमोड करून राबविले जात आहेत. गुरूजन ही कामे शाबासकीच्या हव्यासापोटी करीत नाहीत. अशी स्थिती असताना प्रशासनाने केवळ ड्रेसकोडसाठी गुरूजनांना वेठीस धरू नये, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ड्रेसकोडचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता. तानाजी नरळे यांच्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा पदभार असताना चेष्टा केल्याने गुरूजनांनी गणवेश नाकारला. ओळख पटविण्यासाठी गुरूजनास ड्रेसकोड लादत असाल तर हा प्रयत्न हाणून पाडू.