मोडनिंब : शिक्षकाची नोकरी असूनही केवळ आई-वडिलांनी आपल्याला कष्ट करायला शिकवले व केलेले कष्ट वाया न जात नाही, असा सल्ला दिला होता़ त्यांचा सल्ला प्रमाण मानून नोकरी करीत असतानाही सुटीच्या दिवशी शेताकडे लक्ष दिले़ त्यामुळेच ११ एकरात डाळिंबातून तब्बल ७२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. ही यशोगाथा आहे होळे (ता. माढा) येथील माध्यमिक शिक्षक अंकुश चोपडे यांची.
अंकुश चोपडे हे अरण येथील श्री संत सावता माळी विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांची होळे येथे वडिलोपार्जित शेती आहे़ त्यांच्या मातोश्री लक्ष्मी चोपडे यांना शेतीमध्ये काबाडकष्ट करण्याची सवय होती, त्यांना आपला मुलगा शिक्षक असला तरी त्याने केवळ नोकरीवर अवलंबून न राहता शेतीही चांगल्या पद्धतीने पिकवावी व शिक्षण क्षेत्राबरोबरच शेतीमध्येही आपण प्रगती करू शकतो हे दाखवून द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे अंकुश चोपडे सुटीदिवशी व शाळेच्या वेळेशिवाय आईबरोबर शेतात कष्ट करायचे़ पाच वर्षांपूर्वी माळरानावर डाळिंब लावण्याचा निर्णय घेतला. मात्र जमीन खडकाळ होती़ त्यावर पीक कसे येणार? याचा प्रश्न पडला़ तेव्हा त्यांनी त्या जमिनीत अन्य ठिकाणाहून काळी माती आणून मिसळली़ त्यानंतर जमीन नांगरून भुसभुशीत केली़ विहीर व बोअरला पुरेसे पाणी असतानाही ठिबक सिंचन करून १३ बाय ७ या अंतराने डाळिंबाची रोपे लावली.
तत्पूर्वी त्यामध्ये ३० ट्रेलर शेणखत टाकले़ दुसºया वर्षी झाडाची छाटणी करून प्रत्येक झाडाच्या बुडाला पेस्ट लावून जूनचा बहार धरला. त्यावेळी अंतर्गत मशागत करून शेणखत व गांडूळ खत मिसळले़ झाडांची पानगळ करण्यासाठी फवारणी केली़ पाणी व खते यांचे योग्य नियोजन केल्यामुळे २१ दिवसांनी निरोगी फूलकळी आली़ त्यानंतर ६० दिवसांत पूर्ण फळधारणा झाली़ पहिल्या वर्षी चांगले उत्पन्न निघाल्यामुळे झालेला १५ लाख रुपये खर्च एकाच वर्षात निघाला़ त्यामुळे आम्हा पती-पत्नीला शेतामध्ये आणखी कष्ट करण्याची ऊर्जा मिळाली़ मजुरांना हाताशी घेऊन आम्ही आमची डाळिंबाची शेती चांगल्या पद्धतीने फुलवण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला दोन वर्षे व्यापाºयांनी जागेवरच डाळिंब खरेदी केली. मात्र नंतर सलग तीन वर्षे युरोप, बांगलादेश या देशांमध्ये डाळिंब एक्स्पोर्ट केले़ सध्या भोर्इंजे (ता़ माढा) येथे मार्केट सुरू आहे. यंदा स्वत: जाऊन डाळिंब विकले़ यावेळी उचांकी दर प्रति किलो १०५ रुपये मिळाला, असे चोपडे यांनी सांगितले.
शेती हा फायदेशीर व्यवसाय- आपण शिक्षक असताना शेतीकडे कसे वळलात असे विचारले असता अंकुश चोपडे म्हणाले, शेती हा फायद्याचा व्यवसाय आहे़ मात्र त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे़ तसेच शेतमजुरांना व्यवस्थित हाताळले तर तेसुद्धा प्रामाणिकपणे शेतात काम करतात़ आपल्या गैरहजेरीत पिकांना कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सातत्याने लक्ष ठेवतात़ परिणामी शेती फायदेशीर ठरते़