महाळुंग येथे बुधवारी आठवडे बाजार सुरू होता. सायंकाळी पाचच्या सुमारास या बाजारांमध्ये मोठ्या संख्येने खरेदी करण्यासाठी परिसरातील नागरिक येत असतात. त्यांना कोरोनाबद्दल जनजागृती करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील शिक्षकांनी प्रबोधन सुरु केले आहे. कोरोना विषयी प्रश्नमंजूषा कार्यक्रम देखील घेण्यात आला. यामध्ये व्यापारी, नागरिकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. विजेत्यांना मास्क व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
जे नागरिक दुचाकीवरुन मास्क न बांधता प्रवास करत होते. त्यांना गांधीगिरीच्या मार्गाने गुलाब पुष्प व मास्क देऊन मास्क वापराविषयी जनजागृती करण्यात आली. पंचायत समिती शिक्षण विभाग माळशिरस यांच्याकडून कोरोना जनजागृती मोहिमेंतर्गत कौन बनेगा कोरोना फायटर, चालता बोलता प्रश्नमंजूषा कार्यक्रम, पोस्टर स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, पथनाट्य,लस घेतलेल्या व्यक्तींची मुलाखत असे विविध कार्यक्रम सुरू आहेत.
या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्ताराधिकारी महालिंग नकाते, गांधीजीच्या भूमिकेत रामकृष्ण गुरव, राजाराम गुजर, सुहास उरवणे, पांडुरंग मोहिते, प्रदीप कनाळ, समीर लोणकर, प्रेमनाथ रामदासी, मारुती जाधव, याचबरोबर महाळुंग केंद्राचे केंद्रीय
मुख्याध्यापक रमेश बळकट व सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवून जनजागृती केली.
कोरोना व्हायरसची दुसरी लाट फैलावत आहे. त्यासाठी माळशिरस पंचायत समिती शिक्षण विभागाने जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, शिक्षिका या मोहिमेमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेऊन कोरोना व्हायरसबाबत माहिती देण्यात येत आहे.
- धनंजय देशमुख गटशिक्षणाधिकारी, माळशिरस