कुरुल : कुरुल (ता. मोहोळ) येथे कॅनॉलजवळ पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात साठा केलेला सात पोती गुटखा व आरएमडी असा एक लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल कामती पोलिसांनी धाड टाकून जप्त केला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने शौकत मोतीलाल तांबोळी, उमर नसीर बागवान (दोघे रा. कुरुल) यांच्यावर गुन्हा नोंदला आहे. २६ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली.
पोलीस सूत्रांनुसार कुरुलच्या हद्दीत कुरुल-सोहाळे रोडला कॅनॉलच्या पुढे एका शेडमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित मालाची आणि गुटख्याची साठवणूक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस फौजदार बबलू नाईकवाडी, पोलीस कर्मचारी माने, चौधरी, सावळे, पवार, दळवी यांच्या पथकाने अचानक धाड टाकली. यावेळी पत्राशेडमध्ये सात गोण्या गुटखा व एक बंद बॉक्स आरएमडीचा साठा मिळून आला.
याबाबत कामती पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला संपर्क करून माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी या मालाची पाहणी करून एक लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सूर्यकांत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार बबलू नाईकवाडी करीत आहेत.
----
तपासासाठी दोन दिवसाची कोठडी
याप्रकरणी शौकत मोतीलाल तांबोळी, उमर नसीर बागवान (दोघे रा. कुरुल) यांच्यावर भादंवि ३२८, १८८, २७२, २७३ आणि अन्न सुरक्षा अधिनियम २००६ चे ५९ अन्वये गुन्हा नोंदला आहे. यातील दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
----