अक्कलकोट : कर्नाटकमधून गुटखा भरून घेऊन निघालेली जीप अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडून चार लाख ४२ हजार २९० रुपयांचा ऐवज जप्त केला.
१६ मे रोजी रात्री १ वाजता अक्कलकोटपासून दीड किलोमीटरवर वागदरी रोडवर पुलाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी गफूर महंमद बागवान (वय २८, रा. दत्तनगर वळसंग, ता. दक्षिण सोलापूर), मशाक बडेसाब बागवान (वय ३७, रा गोंदुताई विडी घरकूल, कुंभारी) या दोघांना अटक केली आहे.
१६ मे रोजी रात्री कर्नाटक येथून गुटखा घेऊन जीप वागदरीकडे निघालेली होती. ठाणे अंमलदार विपीन सुरवसे व अंकुश राठोड यांना याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून जीप पकडली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती देताच अन्नसुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी फिर्याद दिली. दरम्यान, जीप सोडून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले होते. त्यांचे शोध घेऊन दोन दिवसांत पोलीस पथक अंमलदार विपीन सुरवसे, अशपाक मियावाले, अंकुश राठोड, अंगद गीते यांनी मिळून आरोपी मशाक याला कर्नाटकातील मादनहिप्परगा तर गफूर याला वळसंग येथून ताब्यात घेतले. आरोपींना बुधवारी दुपारी अक्कलकोट येथे शरद गवळी यांच्या न्यायालयात उभे केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.