सांगोला : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोल्यात मिरज रस्त्यावर सापळा लावून २२८ पोती गुटख्यासह ट्रक पकडला. या कारवाईदरम्यान ट्रकचालकाची हुशारी हाणून पाडण्यात पोलिसांना चांगलेच यश आले आहे. कारवाईतील ट्रक हा १२ लाख किमतीचा, तर गुटखा हा साधारण ३२ लाखांचा आहे. या कारवाईने चोरून गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
ट्रकमधील ३१ लाख ९५ हजार रुपये किमतीचा २२८ पोती गुटखा आणि १२ लाखांचा ट्रक असा जवळपास ४३ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गु्न्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. मंगळवार, २५ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास सांगोला - मिरज रोडवर हॉटेल गोकुळसमोर ही कारवाई झाली.
कर्नाटकातून गुटखा सांगोलामार्गे निघाल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना कारवाईचे आदेश दिले होते. पोलीस उपनिरीक्षक अमित सीद - पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. मंगळवारी संबंधीत गुटख्याने भरलेले वाहन सांगोला - मिरज रोडवरील हॉटेल गोकुळसमोर येताच या पथकाने पकडले. या कारवाईत ट्रक चालकासह त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर अन्न व सुरक्षा व मानदे कायदा कलम २६ (२) (१) २६ (२) (२) २६ (१) सहक २७ (३) (e) नुसार गुन्हा नोंदला आहे.
या कारवाईत सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे, पोलीस हवालदार विजय भरले, पोलीस हवालदार दिलीप राऊत, पोलीस नाईक हरिदास पांढरे, पोलीस नाईक रवी माने, पोलीस नाईक गणेश बांगर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन गायकवाड, केशव पवार, अन्वर आतार यांनी सहभाग नोंदवला.
---
संशय येऊ नये म्हणून ठेवली रिकामी पोती
ट्रक चालकाने गुटखा वाहतुकीत पोलिसांना चकवा देण्यासाठी ट्रकच्या पाठीमागे सुरुवातीला रिकाम्या पोत्यांची बारदाने लावली. त्याच्यापुढे गुटख्याची पोती लावली होती. पोलिसांनी ट्रकमधून १५० पोती हिरा पानमसाला, ७८ पोती रॉयल, ७१७ सुगंधीत तंबाखू असा ३१ लाख ९५ हजार रुपयांचा गुटखा बाहेर काढला. तसेच गुटखा वाहतूक करणारा ट्रक (एमएच २१ एक्स१९४७) जप्त केला.
--
२३ दिवसात तिसऱ्यांदा कारवाई
सांगोल्यात गेल्या २३ दिवसात तिसऱ्यांदा गुटखा पकडला आहे. ३ मे राेजी मस्के कॉलनी येथे अचानक धाड टाकून १ लाख ७५ हजार ९७० रुपयांच्या गुटख्यासह कार जप्त केली होती. त्यानंतर ६ मे रोजी सांगोला येथे वंदे मातरम् चौकात एका टेम्पोसह १४ लाख ६४ हजार ४२० रुपयांचा ४१ पोती गुटखा जप्त केला होता. दरम्यान, मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने २२८ पोती गुटख्यासह ट्रक जप्त करून कारवाई केली. महिनाभरातील पोलीस कारवायांनी गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
--
फोटो : २५ सांगोला
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातून निघालेला २२८ पोती गुटखा सांगोल्यात पकडला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित सीद - पाटील आणि पथकातील कर्मचारी.