मंगळवेढा : लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील जिम, फिटनेस क्लब व व्यायामशाळा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाल्या. तब्बल सात ते आठ महिन्यांपासून जिम सुरू होण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या फिटनेस इच्छुकांनी पहिल्या दिवशी जिममध्ये मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
राज्य सरकारने 'सोशल डिस्टंसिंग'च्या अटींवर परवानगी दिल्यानंतर विजयादशमीच्या मुहूर्तावर जिम सुरू झालेत. मात्र सणामुळे जिम चालकांनी साफसफाई करून पूजा केली. पहिल्या दिवशी फिटनेस इच्छुकांनी जिममध्ये येऊन नोंदणी केली. जिममध्ये व्यायाम करणारे सध्या पहाटे सायकलिंग, फिरणे असा व्यायाम करीत आहेत मात्र जिम बंद असल्याने वजन वाढले आहे तसेच
हिवाळा सुरू झाल्याने हळूहळू मंगळवेढेकर गर्दी करतील, अशी आशा नर्मदा पार्क शिक्षक सोसायटी येथील ओम जीमचे संचालक व योगशिक्षक संतोष दुधाळ यांनी व्यक्त केली. उशिरा का होईना जिमला परवानगी बहाल केल्याबद्दल त्यांनी सरकारला धन्यवाद दिले. त्यामुळे लॉकडाउनकाळात झालेले आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून निघेल, असे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे सध्या तरुणांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे येत्या काळात जिममध्ये गर्दी वाढणार असल्याचे सांगून, शासनाच्या निर्देशानुसार आम्ही नियमित सॅनिटायझेशन, मास्क, 'सोशल डिस्टंसिंग' इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असल्याचे संचालक नितीन मोरे यांनी सांगितले.
कोरोनामुळे छोटेमोठे जिम व फिटनेस क्लब या सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला. केवळ जिम मालकच नव्हे, त्यावर उदरनिर्वाह असलेले प्रशिक्षक (ट्रेनर) व अन्य कर्मचारीही बेरोजगार झाले होते. या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आता जिमला परवानगी मिळाल्याने लॉकडाऊनकाळात झालेले आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून निघेल- संतोष दुधाळ,संचालक, ओम जिम मंगळवेढा.