सध्या शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला दर नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच आणखी भर म्हणून वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र चालू ठेवले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेतकरी टोमॅटो, गवार, भेंडी, काकडी, कोबी, फ्लॉवर यासह अन्य फळभाज्या व पालेभाज्या पिशव्यांमध्ये भरून डोक्यावर घेऊन सहभागी झाले होते. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांचा आदेश आहे, त्यामुळे वीज जोडता येणार नसल्याचे सांगितल्यावर शेतकरी आक्रमक झाले. तेव्हा शिवाजी कांबळे यांनी वीज जोडणीचा निर्णय न घेतल्यास अंगावर पेट्रोल ओतून घेऊन सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करून वीज पुरवठा सुरू करण्यास सांगितले. दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी एका वीज कनेक्शन मागे प्रति एक हजार रुपये जमा करावेत, या विनंतीवर वीज पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले.
........
या मोर्चामध्ये ग्रा.पं. सदस्य कुरण गिड्डे, बालाजी पाटील, शिवाजी सुर्वे, भाजपा शहराध्यक्ष रविकांत जाधव, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू लादे, नितीन गडदरे, दत्तात्रय मोरे, संजीव शिंदे, मनोज शहा आदी उपस्थित होते.
.......
शिवाजी कांबळे यांनी अंगावर ओतून घेतले पेट्रोल
तब्बल दोन तास आंदोलन करूनही वीज वितरण कंपनीचे अधिकारी दखल घेत नसल्याने संतप्त झालेले शिवाजी कांबळे यांनी पेट्रोल मागवून अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून त्यांना थांबविले.
...........
हा भाजीपाला तुम्हीच घ्या अन् बिल भरा
संतप्त शेतकऱ्यांनी आणलेल्या फळभाज्या व पालेभाज्या व्यापारी घेत नाहीत. तुम्हीच विकत घ्या व आम्हाला वीज बिल पावती द्या, असे सांगितल्यानंतर अधिकारी हतबल झाले.
......
फोटो ओळी
मोडनिंब येथे वीज जोडणीच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये डोक्यावर भाजीपाला घेऊन सहभागी झालेले शेतकरी.
......
फोटो २३मोडनिंब