अक्षय आखाडे
कोर्टी: अर्धा एकर क्षेत्र तसं कमी, पण यातूनही काहीतरी वेगळा प्रयोग करायचा अन् अचाट पैसा मिळवायचा या जाणिवेतून राजूरचा जिगरबाज बळीराजा माऊली मोरे यानं चक्क ४ लाख ४२ हजार रुपयांचा दाम मिळविला. खासगी कंपनीतील नोकरी सोडून त्याने शेतीत कलिंगडाच्या बागेसाठी घेतलेल्या श्रमाला खºया अर्थाने काळ्या आईनं साथ दिल्याचे दिसून येतेय.
जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची मानसिकता ठेवली, त्याचबरोबर योग्य दर मिळविला की शेतीमधून खूप कमवता येते, हा विश्वास मनात ठेवून माऊली दत्तात्रय मोरे ( वय २६) या तरुणानं कलिंगडासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. कलिंगडाचे अर्ध्या एकरात साडेतीन महिन्यांत खर्च वजा करता तब्बल ४ लाख ४२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविल्याचे माऊली मोरे यांनी अभिमानाने सांगितले. पूर्वी मोरे बंधूंकडे पारंपरिक शेती केली जात होती. त्याला फाटा देत माऊली मोरे यांनी आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली.अगोदर त्यांनी शेततळे खोदून घेतले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळी तरकारी वर्गातील पिके घेतली. त्यातील एक वाण कलिंगड हे होय.
१५ आॅक्टोबर रोजी कोर्टी येथील महालक्ष्मी नर्सरीमधून शुगर किंग नावाच्या वाणाची कलिंगड रोपे आणून लागवड केली. साठ दिवस कीड रोग नियंत्रणासाठी व्यवस्थित लक्ष दिले. १५ डिसेंबर रोजी कलिंगड काढणीला झाल्यानंतर पुणे, मुंबई येथे विक्रीसाठी पाठविण्यात आले. सरासरी २८ रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळाला. अर्ध्या एकराच्या माध्यमातून मोरे बंधूंना ६२ हजार रुपये खर्च वजा करता १८ टन कलिंगडाचे तब्बल ४ लाख ४२ हजार उत्पन्न मिळाले. यासाठी कृषी विभागातील रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे माऊली मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लागवड आणि कीड रोग नियंत्रणासाठी विशेष लक्ष- कलिंगड लागवडीसाठी प्रथम बेड सोडून दोन बेडमधील अंतर पाच फूट सोडले, त्यानंतर मल्चिंग पेपर अंथरून त्यावर सव्वा फूट अंतरावर जिगजाग पद्धतीने लागवड केली. लागवड केल्यानंतर साठ दिवस रोगराईवर विशेष लक्ष दिले. कीड रोगाच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे व फळ माशीचे नियंत्रण सापळे लावले. किडीच्या नियंत्रणासाठी माऊली मोरे यांनी रात्री कलिंगड शेतीत विजेच्या बल्बचा वापर केला, त्याचा मोठा फायदा झाला. कीड रोगावर नियंत्रण ठेवून मात करता आली तर चागलं उत्पन्न मिळविता येते असं माऊली मोरे यांनी सांगितले.
भाजीपाला आणि फळभाज्यांचे पीक कायम शेतात घेतो. गेल्या तीन वर्षांपासून कलिंगड एकराचा फड कायम चालू असतो. यंदा पण अर्धा एकर कलिंगड लागवड केली होती. परंतु यंदा पाऊस असल्याकारणाने दहा दिवस कलिंगडाचा कार्यकाळ लांबला. चागलं उत्पन्न मिळाले याचे समाधान आहे. आणखीन दीड एकरासाठी कलिंगडाची रोपे बुक केली आहेत. - माऊली मोरे, कलिंगड उत्पादक शेतकरी