प्रभू पुजारी
पंढरपूर : चिकन माती, साखर कारखान्यातून निघणारे बगॅस, राख यांचं मिश्रण़.. त्यात पाणी ओतून चिखल तयार केला़.. त्या चिखलाचा गोळा तयार करून पाण्यासोबत ठराविक आकाराच्या साच्यात ठेवलं, अन् तो साच्या एका ओळीनं ठेवण्याचं काम या दांपत्यांचं सुरु होतं... चिखल कालवल्यालं अर्धा तासात संपल, तेवढं झालं की आम्ही मतदान करायला जाणारंय, असं सांगत व्हते, भटुंबरे येथील भीमा गायकवाड आणि त्यांची पत्नी राणूबाई गायकवाड हे दाम्पत्य़ त्या दोघांचं ठरलंय की निवडणूक कोणतीही असो, मतदान करायच हे नक्की !
निवडणूक कोणती? लोकसभेची की विधानसभेची? काहीही माहिती नाही़ उमेदवार कोण?, त्यांचं नाव काय?, ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत? याबाबत या दाम्पत्यांना बोलतं केलं असता आम्हाला काहीही माहिती नाही़ मतदान करणं एवढंच माहीत़ कारण आम्ही रोज पहाटं झुंजुक झुजुक असताना वीटभट्टीवर कामाला येतोय़ ते सायंकाळी दिस मावळल्यानंतरच घरी जातोय़ त्यामुळं कोण उमेदवार, त्याचं चिन्ह कोणतं, काहीही माहिती नाही़ मग मत कोणाला करणार, असे विचारलं असता, इंदिरा गांधीचा हात चिन्ह होतं तेवढचं चिन्ह माहीत होतं़ त्यानंतर कितीतरी चिन्ह बदलली, त्यामुळं आमच्या लक्षात नाही़ आता कमळ अन् घड्याळ हाय असं लोकं म्हणत्यात़ त्यामुळं दोन्ही पैकी एकाला टाकायचं़ पण मतदान करायचं हे मात्र नक्की !
या वीटभट्टीवर १६ जोडपं हायती, आम्ही सर्वजण जाऊन मतदान करणार हाय़ कारण रक्तदान जस श्रेष्ठ दान आहे, तसं मतदान हेही श्रेष्ठ दान आहे, त्यामुळं मतदान करायला जाणार असल्याचं राणूबाई गायकवाड यांनी सांगितलं..
सरकारकडून काय अपेक्षा असं भीमा गायकवाड यांना विचारलं असता, ते म्हणाले, त्यांच्याकडून काय अपेक्षा असणारं? असा प्रतिप्रश्न करीत प्रश्न उपस्थित करीत आमच्या हाताला काम नाही, त्याची सोय करावी, इतकेच त्यांनी सांगितल.