अक्कलकोट ते कंठेहळ्ळी हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्यावरुन शाळकरी, पादचारी, वाहने रोज कसेबसे ये-जा करीत. मात्र दरवर्षी ऊस कारखान्याला पाठवताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कसरत करावी लागायची. अनेक साखर कारखान्याचे ऊस तोडकरी ऊस तोडण्यास टाळाटाळ करीत होते.
---
पाच दिवसात झाला रस्ता
ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून या रस्त्यावरील ५०० मीटर अंतरावरील डोंगर पोखरुन रस्ता तयार केला. यासाठी दोन जेसीबी व दहा ट्रॅक्टर सलग पाच दिवस काम केले. यामुळे यावर्षी कारखान्याला अडचणीविना ऊस जात आहे. या रस्त्याला निधी मंजूर असतानाही कामाला सुरुवात होत नसल्याने ग्रामस्थ वैतागले होते.
वीस वर्षांहून अधिक कालावधी लोटला तरी या रस्त्याकडे कोणीच पाहायला तयार नाही. यामुळे दरवर्षी ऊस कारखान्याला पाठवताना अडचण निर्माण होत असे. संबंधितांना अनेकवेळा भेटूनही उपयोग झाला नाही. म्हणून लोकवर्गणीतून दीड लाख रुपये खर्चून ५०० मीटरचा डोंगराळ भाग पोखरुन रस्ता तयार केला आहे. यासाठी ११८ शेतकऱ्यांनी दीड लाख रुपये लोकवर्गणी दिली.
-चंद्रकांत वागे, सरपंच, कंठेहळ्ळी.
---
कंठेहळ्ळी गावच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार या रस्त्याला दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे रस्ता बांधणीला उशीर होत आहे.
-सचिन कल्याणशेट्टी, आमदार
---
हा रस्ता मंजूर आहे. मात्र त्यावर शासनाने स्थगिती आणली आहे. लवकरच स्थगिती उठून वर्कऑर्डर होईल आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात करू.
- बी एस थोंटे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अक्कलकोट.
०२अक्कलकोट-रोड
अक्कलकोट ते कंठेहळ्ळी हा ५०० मीटर डोंगराळ भाग पोखरुन लोकवर्गणीतून रस्ता तयार केला आहे.