शीतलकुमार कांबळे
सोलापूर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने संपातून माघार घेतली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था असून अर्धे शिक्षक कामावर तर अर्धे शिक्षक संपावर असल्याचे दिसून येत आहेत.सोलापूर जिल्हा परिषदांच्या शाळेत नऊ हजारांपेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील शिक्षक संघामध्ये सुमारे 5 हजार शिक्षक आहेत. त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाल्याने त्यातील काही शिक्षक संपात सहभागी असून काही कामावर हजर आहेत.
राजीनाम्याचा प्रश्नच नाही
शिक्षक संघाने संपातून माघार घेतल्याने काही शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे शिक्षक संघाचे करमाळा तालुकाध्यक्ष हनुमंत सरडे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष म.ज. मोरे म्हणाले, स्थानिक पातळीवर आम्ही संपात सहभागी झाल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करमाळ्याच्या तालुकाध्यक्षांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही.
संपात सहभागी होण्याचा स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय घेतला आहे. फक्त पाठिंबा न देता संपात सक्रिय सहभाग असावा, अशी आम्ही भूमिका घेतली आहे. शिक्षक बांधवाच्या भविष्याचा विचार करुन आम्ही संपात उतरलो आहोत.- म. ज. मोरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, सोलापूर