अक्कलकोट : तालुक्यात पशुधन विभागात २८ जागा रिक्त आहेत. तालुक्यातील पशुधन सांभाळणाऱ्यांच्या समस्या सुटाण्यासाठी या सर्व जागा तातडीने भरा, अशी मागणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्याकडे केली.
पशुधनासंदर्भात उद्भवलेले अनेक प्रश्न घेऊन ते प्रधान सचिवांच्या दालनात दाखल झाले. अक्कलकोट तालुक्यातील दुग्ध उत्पादन व शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. हवामानातील अचानक बदलामुळे पशूंना काही आजार जडत आहेत. या काळात २८ पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे वेळेवर उपचार होत नाहीत. काही कर्मचाऱ्यांवर जादा भार पडत आहे. तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी वर्ग-१ ची पंचायत समिती जेऊर, अक्कलकोट, करजगी, मैंदर्गी, शिरवळ, वागदरी, दुधनी, शावळ या ठिकाणी प्रत्येकी एक अशी ८ पदे रिक्त आहेत.
शिवाय पशुधन पर्यवेक्षकाची पंचायत समिती अक्कलकोट, मैंदर्गी, वागदरी, सलगर, नागणसूर, तोळणूर, किणी व बऱ्हाणपूर येथे प्रत्येकी एक अशी ११ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे
मैंदर्गी, तोळणूर, नागणसूर, बऱ्हाणपूर, दुधनी, शावळ, शिरवळ, वागदरी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ८ पदे रिक्त आहेत. दुधनी येथे व्रणोपचारकचे एक पद अशी एकूण ४१ पैकी २८ पदे रिक्त आहेत.
---
काही कर्मचाऱ्यांवर १० गावांची जबाबदारी
तालुक्यातील एकूण १ लाख ४२ हजार इतक्या मोठ्या संख्येने पशुधन असलेल्या शेतकरी व पशुपालक यांची अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी गैरसोय होत आहे. काही ठिकाणी एका कर्मचाऱ्यावर १० गावांची जबाबदारी आहे. गेली अनेक वर्षे पदभरती नाही. ही वस्तुस्थिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिली.
---
फोटो : ०४ सचिन कल्याणशेट्टी
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात प्रधान सचिव अनुप कुमार यांच्याशी चर्चा करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी.