सोलापूर : 26 जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारु विक्री व निर्मिती विरोधात सोलापूर जिल्ह्यात एकूण ८ गुन्हे नोंदविण्यात आले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत दोन मोटरसायकलीसह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल विभागाने जप्त केलेला आहे.
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक मस्करे, कदम, दुय्यम निरीक्षक पाटील, झगडे, भांगे, उंडे यांच्यासह जवान कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारी रोजी मुळेगाव तांडा, बक्षीहिप्परगा तांडा, वडजी तांडा, सिताराम तांडा व सेवालाल तांडा या हातभट्टी ठिकाणांवर सामूहिक मोहीम राबवून त्या ठिकाणी गुळमिश्रित रसायनापासून हातभट्टी दारू तयार होत असल्याचे आढळून आले.
सदर कारवाईत ६२०० लिटर रसायन जागीच नाश करून ८१० लिटर हातभट्टी दारू व एक मोटासायकल असा २ लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदर मोहिमेत हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक माळशिरस एस.एस. कदम, दुय्यम निरीक्षक अकलूज वाकडे व त्यांच्या पथकाने सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथे संतोष शिवाजी मोघे (वय 43 वर्षे ) हा इसम रॉयल इन्फिल्ड कंपनीची बुलेट गाडी क्रमांक MH 45 AP 4242 या मोटरसायकलवरून हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच एका अन्य गुन्ह्यात आनंदा धर्मा अवघडे (वय 45) वर्षे हा इसम हातभट्टी दारू विक्री करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर दोन्ही कारवाईत निरीक्षक माळशिरस यांच्या पथकाने एकूण एक लाख ११ हजार इतका किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी ठिकाणांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून हॉटेल व धाब्यांचीही वारंवार तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांना अवैध दारू, बनावट किंवा परराज्यातील दारू विक्री बाबत काही माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळविण्याचे आवाहन नितीन धार्मिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी केले आहे.