सोलापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा तपासणी नाका नांदणी येथील पथकाने ७ डिसेंबर रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ तांडा या ठिकाणी हातभट्ट्यांवर धाडी टाकून त्या ठिकाणी तीन गुन्हे नोंदवले असून एक हजार तिनशे पस्तीस लिटर हातभट्टी दारू व चार हजार लिटर गुळमिश्रित रसायन असा एकूण एक लाख बासष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क अ २ विभागाच्या दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार त्यांनी जवान शोएब बेगमपुरे यांच्यासह एमआयडीसी रोड परिसरात विनायक नगर येथील एका पत्र्याचे शेडमध्ये व्यंकटेश सोमनाथ दोमल, राहणार सिद्धेश्वर नगर सोलापूर याच्या ताब्यातून सहाशे पन्नास ६५० मिली क्षमतेचे दहा बॉक्स मध्ये युनिक ड्रिंक्स असे लेबल असलेले फ्रुट बियरच्या ३ हजार ६५० रूपयांच्या १२० बाटल्या जप्त केल्या. तसेच साईबाबा चौक येथील गोवर्धन किराणा दुकानाच्या डाव्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमधून अंबादास गायकवाड याच्या ताब्यातून ६५० मिली क्षमतेच्या सेलिब्रिटी ड्रिंक्स असे लेबल चिकटवलेल्या फ्रुट बिअरच्या १५० बाटल्या असा एकूण ५ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई निरीक्षक गुलाब जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान वसंत राठोड व वाय.बी. तोग्गी यांच्या पथकाने केली आहे.