सोलापूर : नावीन्यपूर्ण सोलापुरी हातमाग उत्पादनांना बाजारपेठांकडून चांगली मागणी आहे. डिजिटल मार्केटिंगचा अभाव असल्याने सध्या सोलापुरातील हातमाग व्यवसायाची पिछेहाट होत आहे; पण याचा वापर केल्यास सोलापुरी विणकरांच्या उत्पादनांना जगभरातून चांगली मागणी येईल. पूर्ववैभव निश्चित प्राप्त होईल. कारण फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांनी सोलापुरात येऊन उत्पादने खरेदीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र येथील विणकरांमध्ये याबाबत उत्सुकता दिसली नाही. केंद्र सरकार हातमाग उत्पादने वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
विणकर कलेला प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द नरेंद्र मोदी पुढाकार घेत आहेत. अशा काळात सोलापुरी हातमाग उत्पादने जगाच्या पटलावर उमटू शकतात. एक वेगळी छाप निर्माण करू शकतात. कॉटन साडी, सिल्क साडी, धोती, टॉवेल, वॉल हैंगिंग, खादी प्लेन कापड, बैठक पट्टी यासह इतर हातमाग उत्पादनांना बाजारपेठांमध्ये चांगली मागणी आहे. सोलापुरातील तेलुगू भाषिक मोठ्या संख्येने या व्यवसायात आहेत. बहुतांश हातमाग विणकर हे अशिक्षित असल्यामुळे जुन्या पद्धतीने व्यवसाय करतात. ठरावीक व्यापाऱ्यांनाच माल विकतात. त्यांना डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान नाही. किंवा त्याबाबत ते उत्सुकदेखील नाहीत. यामुळे व्यवसायाला व्यापकता आलीच नाही.
पूर्वी सोलापुरात हजारो हातमाग होते. आता ही संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. आजही काही विणकर पारंपरिक आणि नावीन्यपूर्ण हातमाग उत्पादन घेतात. विणकर बांधव पारंपरिकरीत्या व्यवसायात गुंतल्यामुळे अपेक्षित बाजारपेठ मिळेना. त्यामुळे व्यवसायाची वाढ खुंटली.
विणकर अडचणीत
पूर्वी सोलापुरात १६७ हातमाग सहकारी सोसायट्या कार्यरत होत्या. यातील ३६ संस्था अवसायनात गेल्या, तर १८ संस्था बंद पडल्या. सध्या फक्त ११५ सोसायट्या चालू आहेत. सध्या ६३० विणकर आहेत, तर १३२ सहाय्यक विणकर आहेत. ५० विणकरांना मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध झाले, तर १००हून अधिक विणकरांना विणकर क्रेडिट कार्ड दिले. विणकरांना बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होत नाही. त्यामुळे विणकर अडचणीत आहेत.