गोपालकृष्ण मांडवकर सोलापूर : येत्या जुलै महिन्यापासून सुरू होणाºया आषाढी वारीमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी नवे पाऊल उचलले आहे. यंदा प्रथमच वारीच्या मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोबाईल शौचालयांसोबतच मोबाईल हँडवॉश पॉर्इंटही राहणार आहेत.
प्रशासनाने डॉ. भारूड यांची वारी समन्वयक म्हणून यंदा सलग दुसºया वर्षी नियुक्ती केली आहे. मागील वर्षी निर्मल वारीची संकल्पना यश्स्वी ठरल्याने यंदा या स्वच्छतेला हँडवॉश पॉर्इंटचा जोड दिला जाणार आहे. या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना डॉ. भारूड म्हणाले, आरोग्य विभागाचा हात धुवा उपक्रम आम्ही राबवितो. त्याचे पालनही करतो.
वारीमध्ये ही संकल्पना अमलात आणली जाणार आहे. वारीच्या मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी मोबाईल शौचालये आम्ही यंदाही ठेवणार आहोत. अशा सर्व ठिकाणी १०० शौचालयांमागे एक या प्रमाणानुसार हँडवॉश पॉर्इंट असेल. या ठिकाणी साबण अथवा लिक्विड सोपची व्यवस्था असेल. वारकºयांनी हात धुतलेले पाणी टबमध्ये जमा केले जाईल. त्यानंतर ते इतरत्र फेकून न देता झाडांना पाणी देऊन त्याची विल्हेवाट लावली जाईल.
वारकºयांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेपूर काळजी घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या असून पिण्यासाठी पाणी, औषध, रुग्णवाहिका, वैद्यकीय व्यवस्था राहणार आहे.
वारी मार्गावरील गावे गटारमुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व संवर्ग विकास अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने मिळणाºया सहकार्याबद्दल डॉ. भारूड यांनी समाधान व्यक्त केले. पंढरपूरमध्ये वारीपूर्वी स्वच्छता हवी, यासाठी जिल्हाधिकारी आग्रही आहेत. त्या दृष्टीनेही नियोजन सुरू आहे. खरी स्वच्छतेची गरज वारीच्या काळात असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाचाही विचार प्रशासन करीत आहे. यासोबतच टी-शर्ट घातलेले कार्यकर्तेही वारीमध्ये सहकार्यासाठी असणार आहेत.
मंदिर परिसरातील बाईक पेट्रोलिंगचे नियोजन- पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या मंदिराभोवती असणाºया पूजा साहित्य विक्री करणाºया दुकानदारांचा अडथळा मोठ्या प्रमाणावर वारकºयांना होतो. आधीच रस्ता लहान असल्याने भररस्त्यावर थाटलेल्या दुकानांमुळे मार्ग पुन्हा अरुंद होतो. लाखोंच्या संख्येने येणाºया वारकºयांना त्रास होऊ नये म्हणून दुकानदारांसोबत योग्य समन्वय साधून यंदा मार्ग मोकळा ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी मंदिर परिसरात बाईक अथवा सायकल पेट्रोलिंगचाही विचार प्रशासनाकडून केला जात आहे.