सोलापूर : आषाढी एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाने भाविकांसाठी चार मोबाईल हॅँडवॉश साकारले आहेत. या मोबाईल व्हॅन वारी मार्गावर रवाना झाल्या.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कार्यकारी अभियंता कटकधोंड, शंकर बंडगर, यशवंती धत्तुरे, प्रशांत दबडे, मुकुंद आकुडे आदी उपस्थित होते.
या मोबाईल व्हॅनबद्दल विजय लोंढे म्हणाले, वारीच्या निमित्ताने सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी झेडपीच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाकडे मोबाईल हॅँडवॉश तयार करण्याची संकल्पना बोलून दाखविली. त्याचे महत्त्व पटवून दिले. यानुसार स्वच्छ भारत मिशन कक्षाने चार वाहने १५ दिवसांसाठी भाड्याने घेतली. सोलापुरातील प्रसिद्ध आर्किटेक्चर मनोज खुब्बा यांनी डिझाईन तयार केले. नारायण जगताप यांनी व्हॅन बनविण्यासाठी योगदान दिले.
हँडवॉश स्टेशनची वैैशिष्ट्ये- वाहनांवर सहा वॉश बेसीन बसविण्यात आल्या आहेत. हात धुण्यासाठी एक हजार लिटरची टाकी बसविली आहे. हात धुतलेले पाणी रस्त्यावर पडू नये म्हणून टाकावू पाण्यासाठी एक हजार लिटरची टाकी बसविण्यात आली आहे. या वाहनांवर बसविलेल्या स्पीकरवरुनही भाविकांना शौचालयाचा वापर करण्याबाबत, हात स्वच्छ धुण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. जमा झालेल्या सांडपाण्याचा वापर झाडांना पाणी घालण्यासाठी केला जाणार आहे. गोपाळकाल्यापर्यंत हे हॅँडवॉश स्टेशन कार्यरत राहणार असल्याचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा परिषद नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात अग्रेसर आहे. मागील वर्षी आरोग्यदूत उपक्रम खूप वेगळा ठरला. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकºयांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली हँडवॉश मोबाईल व्हॅन यंदाच्या वारीतील वेगळा उपक्रम ठरेल. - संजय शिंदे, अध्यक्ष, जिल्हा परिषद