सोलापूर : सतत मोबाईल हँग होतात. बॅटऱ्या फुगल्या आहेत. चार्जिंग केल्यावर मोबाईल गरम होताे. दुरुस्तीचा खर्च मिळत नाही. खर्चही परवडत नाही, म्हणून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी वैतागून मोबाईल परत केले आहेत. आता दोन जीबीच्या मोबाईलऐवजी किमान सहा जीबीचा चांगला मोबाईल दिल्यास कामे करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
कोरोना काळात अंगणवाडीतील सर्व माहिती ऑनलाईनद्वारे भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शासनाकडून ॲँड्राॅईड मोबाईल दिले आहेत. त्या मोबाईलवर दररोज माहिती अपडेट करून वरिष्ठांकडे पाठविणे बंधनकारक आहे. शासनाकडून दिलेले मोबाईल सतत हँग होत आहेत, अशी ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आंदाेलन करून मोबाईल अधिकाऱ्यांकडे जमा केले आहेत. त्यामुळे कामे ठप्प पडली आहेत. आता वरिष्ठांनी मोबाईल परत घ्या, म्हणून तगादा सुरू केल्याचे सांगण्यात आले. मात्र, खराब मोबाईल घेऊन कामे कशी करायची, असे म्हणत आशाताई मोबाईल घेण्यास तयार नाहीत. त्यांना आता नवीन स्मार्ट मोबाईल हवा आहे.
.........................
कामाचा व्याप वाढला
मोबाईल दिल्यापासून कामाचा व्याप वाढला आहे. कोरोनाबाबत काम करीत मोबाईलमध्ये माहिती अपडेट करणे, मुलांचे वय, आधार क्रमांक, अनपौरिक माहिती, आहार, वजन, गरोदर महिलांची माहिती, मासिक माहिती भरावी लागते. शिवाय आता पोषण आहाराची माहिती इंग्रजीमध्ये भरावी लागत आहे. काही कमी शिकलेल्या सेविका आहेत. त्यांना इंग्रजीमध्ये माहिती भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे पोषण आहाराची माहिती मराठीत भरण्यासाठी ॲप तयार करून देण्याची मागणी होत आहे.
............
असून अडचण नसून खोळंबा
मोबाईल खराब असल्यामुळे माहिती भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे मोबाईल परत केला आहे. दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ५ हजार ते आठ हजारांपर्यंत खर्च सांगतात. खर्चही मिळत नाही. चांगला मोबाईल दिल्यास काम करू.
- उषा नलावडे, अंगणवाडी सेविका
.............
मोबाईलची रॅम कमी असल्याने हँग होत आहेत. त्यामुळे कामे होत नाहीत. शासनाकडे मोबाईल परत केले आहेत. आता वरिष्ठांकडून पुन्हा परत देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेच खराब मोबाईल घेऊन काय उपयोग होणार आहे.
- हेमा गव्हाणे, अंगणवाडी सेविका
...........
दोन टक्केच मोबाईल खराब
सर्वच मोबाईल खराब आहेत, असे नाही. केवळ दोन टक्केच मोबाईल हँग होत आहेत. तेही दुरुस्तीसाठी माणसे नेमली आहेत. त्या त्या तालुक्यात जाऊन दुरुस्ती करण्यात येत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोबाईल परत घेण्याचे सूचित केले आहे.
-जावेद शेख, महिला व बालकल्याण अधिकारी
...........
म्हणून केला मोबाईल परत
१) मोबाईल सतत हँग होत आहेत. बॅटऱ्या खराब आहेत. त्यामुळे मोबाईल फुटण्याची भीती वाटते.
२) ९५ टक्के मोबाईल खराब आहेत. दुरुस्तीचा खर्च परवडत नाही. त्यामुळे नवीन चांगला मोबाईल द्यावा.
३) पोषण आहाराची माहिती इंग्रजीऐवजी मराठीत भरून देण्यासाठी नवीन ॲप तयार करा
.......
जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या : ४२११
अंगणवाडी सेविका : ३१७५
मदतनीस : ३०२७
मिनी अंगणवाडी सेविका ९१६
परत केलेले मोबाईल संख्या : ३२५०