मंगळवेढा:मल्लिकार्जुन देशमुखे
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्ताने नागरीकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्या. या लढयातील क्रांतीकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर झेंडा हा उपक्रम ध्वजसंहितेचे पालन करुन जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे या उपक्रमांतर्गत मंगळवेढा शहरासह तालुक्यात ४०हजार घरे व इमारतीवर तिरंगा झेंडा फडकावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली
२१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्याबाबत आयोजित आढावा पार पडली. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे
१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्येक घरावर, कार्यालयावर, दुकानावर भारतीय राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहे. नागरीकांना राष्ट्रध्वज सहज खरेदी करता येईल यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात ध्वज विक्री केंद्र निश्चित करण्यात येणार आहेत. हर घर झेंडा हा उपक्रम राबवितांना भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही या दक्षतेसाठी पुढील महिन्यात या उपक्रमाची विविध माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती करण्यात येणार आहे. कोणत्या आकाराचे राष्ट्रध्वज घरी, कार्यालय आणि दुकाने यामध्ये लावण्यात यावे याबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे जरुरीचे आहे अशी माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली भारतीय ध्वजसंहिता २००६ याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन केले जाईल.
सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी व्यापक प्रमाणात जाणीव जागृती मोहिम या उपक्रमासाठी प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरीकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन हर घर झेंडा हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.तालुक्यातील आवश्यक घरांची संख्या लक्षात घेऊन स्थानिक विक्रेते व पुरवठादार यांच्याशी संपर्क करून तिरंगा झेंडा खरेदीबाबत नियोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील महिला बचतगटांना सुद्धा याबाबत प्रशिक्षण देवून तिरंगा झेंडा निर्मिती करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत अशी माहिती तहसीलदार रावडे यांनी दिली.
सशुल्क झेंडे उपलब्ध करणार---
शासनाच्या हर घर झेंडा हा उपक्रमांतर्गत नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकावण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. झेंड्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी स्टॉल उभारून नागरिकांना सशुल्क झेंडा उपलब्ध करून देणार आहे असल्याचे स्वप्नील रावडे यांनी सांगितले.