वैराग : शेतात पाईपलाईन करावयाची आहे, कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावे म्हणून गरोदर महिलेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरा, नणंद यांच्याविरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
साजिद मुस्तफा यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार चार वर्षांपूर्वी वैराग येथील फिर्यादी साजिद मुस्तफा यांचा पंढरपूर येथील मुस्तफा शेख याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर एक महिन्यातच शेतात पाईपलाईन करायची आहे, झालेले कर्ज फेडायचे आहे म्हणून पती व सासू, सासरे, नणंद यांनी एक लाख रुपये घेऊन ये म्हणून जाचहाट सुरू केला.
काही दिवसांनी गरोदर राहिल्यावरदेखील अतिकष्टाची कामे सांगून शारीरिक, मानसिक त्रास दिला. तसेच उपाशी पोटी ठेवून रात्री अपरात्री घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत वडील शादूल पठाण (रा. वैराग) यांना मुलीचा छळ सुरू असल्याचे समजताच २२ हजार व परत ४५ हजार रुपये असे दोनवेळा त्यांनी पैसे दिले. त्यानंतर त्यांना समाजावून सांगितले होते.
दरम्यान, फेब्रुवारी २०२१ मध्ये आई पंढरपूर येथे आल्यावर तिला काठीने मारहाण केली. तसेच कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सही दे, तलाक दे म्हणून घरातून हाकलून दिले आहे. तेंव्हापासून ती माहेरी वैराग येथे आली. १४ जुलै रोजी पीडित महिला साजिदा शेख यांनी महिला सुरक्षा कक्षात तक्रार दिली. बुधवारी वैराग पोलिसात पती मुस्तफा शेख, सासरा सत्तार शेख, सासू शबाना शेख, नणंद मुस्कान शेख (सर्व, रा. पंढरपूर) यांच्या विरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.